नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्री ही घटना घडली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी १० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून तब्बल ९ तासानंतर आग विझवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील शिरवणे एमआईडीसीमधील शुभदा कंपनीमध्ये रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्नीशम दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल नऊ तासानंतर आग आटोक्यात आली आहे. या संदर्भात अग्निशमन विभागाचे अधिकारी एस.एल. पाटील म्हणाले की, घटनास्थळी १२ अग्निशमन गाड्या उपस्थित आहेत. आम्ही लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या जीवित आणि मालमत्तेचे नुकसान आणि आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, याआगीत कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे. या घटनेवेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.