नातेवाइकांशी बोलता आल्यामुळे परदेशी कैद्यांना दिलासा
पुणे : कारागृहात कैद्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची फरपट, प्रवासाचा खर्च अशा अनेक बाबींमुळे नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत होता. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी होणाऱ्या गर्दीत संवाद साधताना अडथळे येत असल्याने कारागृह प्रशासनाने सुरू केलेल्या ई-मुलाखत सुविधेमुळे कैदी आणि त्यांच्या नातेवाइकांमधील संवाद वाढला आहे. या सुविधेचा गेल्या वर्षभरात राज्यातील विविध कारागृहांत असलेल्या तीन लाखांहून जास्त कैद्यांनी लाभ घेतला असून, गंभीर गुन्ह्यात कारागृहात असलेल्या ११०० परदेशी कैद्यांना नातेवाइकांशी संवाद साधता आल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे.
राज्यातील कारागृहात कच्च्या कैद्यांची (न्यायाधीन बंदी) संख्या जास्त आहे. प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाइकांची गर्दी होते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने ‘ई-प्रिझन’ संगणकीय प्रणालीचा वापर करून ई-मुलाखत सुविधा ४ जुलै २०२३ पासून राज्यातील सर्व कारागृहांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक जानेवारी २०२४ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यातील विविध कारागृहांत तीन लाख १६ हजार ७४७ कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेतला असल्याचे कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी सांगितले.
या सुविधेत नोंदणी केल्यानंतर इच्छित दिवशी कैदी आणि नातेवाइकांची मुलाखतीची प्रक्रिया पार पडते. राज्यातील सर्व कारागृहांच्या प्रवेशद्वारांसमोर या सुविधेची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. कैद्यांचे नातेवाईक, वकिलांना ई-मुलाखत नोंदणी कशी करावी. याची माहिती देण्यात आली आहे, तसेच एलईडी फलकावर मुलाखत नोंदणीची चित्रफीत दाखविण्यात येत आहे. राज्यातील ६० कारागृहांत ही सुविधा उपलब्ध असल्याचे बुरडे यांनी स्पष्ट केले. बुरडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे कामकाज सुरू आहे.