पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना राबविली जाते. पूर्वी कर्मचाऱ्याकडून १३६ रुपये घेऊन १० लाख रुपयांचा विमा उतरवला जायचा. नंतर रक्कम वाढवली होती. यात दुजाभाव केला जात होता. त्यामुळे यामध्ये बदल केला आहे. आता १ ते ४ वर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा विमा असणार आहे. त्यासाठी अवघ्या ४४७ रुपयांची कपात केली जाणार आहे. या पॉलिसीची मुदत ३० जानेवारी २०२५ ते २९ जानेवारी २०२६ अशी असणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागांत अनेक कर्मचारी काम करतात. जवळपास २० हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना दिल्या जातात. आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता; परंतु २०१६-१७ पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे. कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. परिपत्रकानुसार ही विमा पॉलिसी जगभरात कुठेही अपघात झाला तरी वापरता येणार आहे.