Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीजगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

संत साहित्याचे समृद्ध संचित मराठी रुपेरी पडद्यावर

मुंबई: संत विचारावर महाराष्ट्र समृध्द झाला आहे. या संतांनी अभंग-श्लोक-ओव्या अशा रचनांतून साहित्याचा अलौकिक ठेवा मराठी भाषेला दिला. अध्यात्म, रुढी-परंपरांकडे पाहण्याची एक निर्मळ दृष्टीही दिली. आजच्या काळात या दृष्टीची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. ‘शिवराज अष्टकाच्या’ रूपाने घराघरांत पोहचलेले गुणी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज अन त्यांच्या शूर शिलेदारांचा इतिहास जागतिक सिनेमांच्या पातळीवर नेऊन ठेवलाय. ‘शिवराज अष्टक’ नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ या नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटाचे देखणे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘साईराम एंटरप्राईजेस’ निर्मित, योगेश सोमण लिखित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘आनंदडोह’ हा भव्य मराठी चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षक भेटीला येणार आहे. अविनाश शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुक्ता बर्वे, योगेश सोमण, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे असे मराठीतले नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

Shah Rukh Khan : शाहरुख आणि प्रितीचा रोमांटिक ड्रामा चित्रपटगृहात पुन्हा झळकणार!

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंगगाथा हा मराठी साहित्यातील फार अनमोल ठेवा आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेशी झगडताना त्यांनी बहुजन समाजाला ज्ञानमार्ग दाखवतील असे अनेक अभंग रचले. त्यांच्या ३००० हून अधिक अभंगातून आजही आपल्याला जगण्याची प्रेरणा व मार्गदर्शन मिळते. यातले अनेक अभंग म्हणींच्या स्वरूपात सुद्धा अलंकृत झालेले पहायला मिळतात. या अभंगगाथेतल्या तत्वज्ञानाला तत्कालीन रूढीवादी पंडितांनी विरोध केला. संत तुकाराम महाराजांची ही गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडविण्यात आली. संत तुकारामांच्या भक्तीचा चमत्कार म्हणून हे अभंग इंद्रायणीतून तरले, असे सांगण्यात येते. हीच अद्वित्तीय अभंगगाथा इंद्रायणी डोहात बुडल्यापासून ते तरल्या पर्यंतच्या तेरा दिवसात जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, त्यांची पत्नी आवली, त्यांचे कुटुंब,संपूर्ण तत्कालीन समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक या सगळ्यांवर काय परिणाम झाला याची कथा ‘आनंदडोह’ चित्रपटात असणार आहे.

आजच्या परिस्थितीत संत साहित्याच्या समृद्ध संचिताविषयी कृतज्ञतेचा भाव मनात असून हे संचित आपल्याला पुन्हा एकदा जगण्याचे बळ देणारे असेल या विश्वासाने आम्ही संत परंपरेतील चित्रपटांच्या निर्मितीचा संकल्प लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -