मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार तथा माजी आमदार सिताराम दळवी (Sitaram Dalvi) यांचे आज, शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले, ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
अंधेरी विधानसभा मतदार संघातून १९९५ ला शिवसेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. त्यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्हणून ते विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस हे त्यांचे मुळ गाव असून त्यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अॅड. प्रतिमा आशिष शेलार, सुना नातवंडे असा परिवार आहे.
आज संध्याकाळी ६.३० वाजता त्यांच्यावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा संदिप दळवी यांनी त्यांना अग्नी दिला यावेळी जावई मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांच्यासह खासदार रवींद्र वायकर, शिवसेना (उबाठा सेना) आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, पराग अळवणी, माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी शिवराम दळवी, अमोल किर्तीकर, जितेंद्र जनावळे, हाजी अराफत शेख, जयेंद्र साळगावकर, विनोद शेलार मुरजी पटेल, वर्षा विनोद तावडे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.