सुमारे ९.४ कोटी शेतक-यांना पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या १८ व्या हप्त्या अंतर्गत सुमारे २०,००० कोटी रुपयांचे वितरण
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे सुमारे २३,३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. या उपक्रमांमध्ये पीएम-किसान सन्मान निधीचा १८वा हप्ता वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ५वा हप्ता जारी, कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत ७,५०० हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण, ९,२०० शेतकरी उत्पादक संस्था, संपूर्ण महाराष्ट्रात १९ मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क, आणि पशुधनासाठी युनिफाइड जीनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ, याचा समावेश होता.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान वाशिमच्या पवित्र भूमीतून पोहरादेवी मातेसमोर नतमस्तक झाले आणि आपण आज माता जगदंबेच्या मंदिरात दर्शन घेतले आणि देवीची पूजा केली याचा उल्लेख त्यांनी केला. संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन या थोर संतांना आपण आदरांजली वाहिली असे त्यांनी सांगितले. गोंडवानाची महान योद्धा, राणी दुर्गावती यांच्या जयंतीचाही त्यांनी उल्लेख केला आणि गेल्या वर्षी देशाने या राणीची ५०० वी जयंती साजरी केली होती, त्याचे स्मरण केले.
पीएम-किसान सन्मान निधीच्या १८ व्या हप्त्याचे आज वितरण झाले असून, या अंतर्गत सुमारे २०,००० कोटी रुपये ९.५ कोटी शेतक-यांना वितरीत केल्याचे अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या शेतक-यांना दुहेरी लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही उल्लेख केला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ९० लाख शेतक-यांना अंदाजे १९०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
पोहरादेवी येथे बंजारा विरासत संग्रहालयाच्या आज झालेल्या उद्घाटनाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, नव्याने उद्घाटन करण्यात आलेले संग्रहालय भावी पिढ्यांना बंजारा समाजाच्या प्राचीन संस्कृतीची आणि समृद्ध वारशाची ओळख करून देईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान तसेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.