तीन दिवसांतील ही दुसरी घटना
मुंबई : बुधवारी पुन्हा एकदा अटल सेतूवर अशीच एक घटना घडली आहे. मुबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत एका ५२ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. तीन दिवसांतली ही दुसरी घटना आहे. मुंबईतील एका मोठ्या बँकेतील उपव्यवस्थापक सुशांत चक्रवर्ती (४०) यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून समुद्रात उडी मारली. त्यांचा मृतदेह मंगळवारी नवी मुंबीतील जेएनपीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. मृतदेहाची ओळख पटली असून नवी मुंबई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून हे प्रकरण शिवडी पोलिसांकडे वर्ग केलं आहे.
बुधवारी सकाळी अटल सेतूवरून उडी मारून व्यावसायिक फिलीप शाह यांनी आत्महत्या केली आहे. माटुंगा येथील रहिवासी असलेल्या शाह हे त्यांची सेडान कार घेऊन अटल सेतूवर गेले होते. त्यांनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला लावली आणि समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, पूलावरील सीसीटीव्ही निंयत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी एक कार उभी असलेली पाहिली. त्यानंतर त्यांनी बचाव पथकाशी संपर्क साधला.
नियंत्रण कक्षातील कर्मचारी व बचाव पथक कारजवळ पोहोचले. जिथून शाह यांनी समुद्रात उडी घेतली त्याच भागात शोधमोहिम हाती घेण्यात आली. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी देखील समुद्रात उडी घेत शोध सुरू केला. यासाठी एक बोटही समुद्रात नेण्यात आली. काही तासांच्या शोधमोहिमेनंतर बचाव पथकाने शाह यांना समुद्रातून बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सांगितले की, बऱ्याच वेळापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे. शाह यांच्याकडील आधार कार्डद्वारे त्यांची ओळख पटली.