लखनऊ: उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्यानंतर एका महिलेने आपल्या ८ महिन्यांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.
न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी गुरूवारी सांगितले की एका महिलेने दावा केला होता की तिची आठ महिन्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. मात्र पोलिसांना तपासादरम्यान आढळले की आपल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर चिडलेल्या पत्नीनेच आपल्या मुलीची हत्या केली होती.
ही घटना २९ सप्टेंबरला परसपूर भागात घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार मुलगी अनेकदा या दाम्पत्याच्या भांडणाचे कारण होत असे. २९ सप्टेंबरच्या रात्री फोन कॉलवर पतीसोबत भांडण झाल्यानंतर रागात असलेल्या पत्नीने आपल्या मुलीला घराजवळच्या सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले होते.त्यानंतर सकाळी दावा केला की तिची मुलगी बेपत्ता झाली आहे.
आरोपी महिलेचा पती कामानिमित्त मुंबईत राहत असे. तर पत्नी जगमती आपल्या सासरच्यांसोबत गावात राहत होती. सोमवारी सकाळी जगमतीने कुटुंबियांना सांगितले की तिची मुलगी शगुन बेपत्ता झाली आहे. तिने असा दावाही केला की तिला कोणीतरी जंगली प्राणीघेऊन गेला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता जगमतीच्या घराच्या मागे सेप्टिक टँकमध्ये मुलीचा मृतदेह आढळला.
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर कोणतेही निशाण नव्हते. तिचा मृत्यू बुडल्यामुळे झाला. यानंतर पोलिसांनी जेव्हा जगमतीकडे चौकशी सुरू केली तेव्हा तिच्या विधानांमध्ये अंतर होते. जेव्हा तिच्याकडे कडक चौकशी केली असता तिनेच आपल्या मुलीला मारल्याची कबुली दिली.