पुणे : पुणे शहरातून (Pune) भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील बावधान परिसरात खासगी हेलिकॉप्टर कोसळून (Helicopter Crash) ३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बावधन परिसरात ही घटना घडली. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला. दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली असून परिसरातून धुराचे लोट पसरले होते.
दरम्यान, दाट धुक्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज असून या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले असून हिंजवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या नेतृत्वातील पथक या अपघाताची अधिक चौकशी करीत आहेत.