‘असे’ असतील पर्यायी मार्ग
अमरावती : नवरात्रोत्सव दरम्यान अमरावतीमध्ये अपघात होऊ नये किंवा कायदा व सुव्यथेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी एक अधिसुचना जारी केली आहे. यामध्ये शहरातील १० मार्गावर नवरात्रोत्सव काळात जड वाहनांना बंदी करण्यात आली असून अंबादेवी, एकविरा देवीसह मोठया मंडळांजवळ पार्किंगचे स्थान निश्चित केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्री दरम्यान एकविरा देवी, अंबादेवी मंदिर, राजकमल चौक, गांधी चौक,चुनाभट्टी रोड, अंबागेट मार्गाव्रील यात्रेत होणारी भाविकांची गर्दी पाहता सुरक्षिततेच्या खबरदारीने उपाययोजना म्हणून ३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपासून १२ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मंदिर परिसर, यात्रा मार्ग आणि मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणा करिता सुचना दिल्या आहेत. या कालावधीत अनेक मार्ग बंद करण्यात आले असून पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद?
- राजकमल चौक ते अंबागेट, साबनपुरा ते गांधी चौक, ओसवाल भवन ते गांधी चौक, डॉ. धवड यांच्या दवाखाना ते गांधी चौक, मुख्य पोस्ट ऑफीस रोड ते पंचशिल लॉन्ड्री ते गांधी चौक पर्यंत, भुतेश्वर चौक ते गांधी चौक पर्यंत, नमुनाकडून अंबादेवी देवस्थानकडे जाणारे सर्व लहान रस्ते बंद राहतील.
- सक्कारसाथ ते भाजीबाजार जैन मंदिरापर्यंत, अंबागेट ते औरंगपुरा मार्ग, अंबादेवी मंदिराकडे जाणारा मार्ग, टांगापडाव ते साबपुरा पोलिस चौकी ते प्रभात चौक या मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
काय आहेत पर्यायी मार्ग?
- मालवाहु, जड व हलकी, गिट्टी बोल्डर वाहने जुनी वस्ती बडनेरा टी-पाईन्ट येथून जुना बायपास मार्गे एमआयडीसी, दस्तुर नगर चौक, चपराशीपुरा चौक, बियाणी चौक येथून डावे वळण घेऊन गर्ल्स हायस्कुलचौक, इर्विनचौक, मालवियचौक, दिपक चौक मार्गांचा अवलंब करता येईल.
- एसटी बसेस बसस्थानक, राजकमल, गद्रे चौक मार्ग बडनेरा जात व येतात त्या बसेस वाहनांसाठी राजापेठ-इर्विन चौक या उड्डाणपुलावरून गर्ल्स हायस्कुल चौक, पोलिस पेट्रोल पंप, बस स्थानक किंवा जुनी वस्ती बडनेरा येथून उजवे वळण घेऊन जुना बायपास मार्गाने दस्तुनगर, चपराशीपुरा चौक, बसस्थानक या पर्यायी मार्गाचा अवलंब करितील.
- बसस्थानकातून नागपुरीगेट मार्ग बाहेरगावी जाणाऱ्या बस रेल्वे स्टेशन चौक, इर्विन चौक, चित्रा चौक मार्ग जातील व याच मार्गाने शहरात येऊन गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे बसस्थानकात जातील. राजापेठ चौकाकडून शहरात येणाऱ्या हलके चारचाकी वाहन यांना राजकमल चौकात प्रवेशबंदी असल्याने वाहनधारकांनी राजापेठ उड्डाणपुलाचा वापर करावा.
अशी आहे वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था
नवरात्री काळात भाविकांच्या वाहनांसाठी नेहरू मैदान, ओसवाल भवन मैदान, मुधोळकरपेठ मैदान, ओसवाल भवन ते गद्रे चौका कडील रस्त्याचे एका बाजुस, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे वळणापासून ते साईनगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे एकाबाजुस, साबनपुरा चौक ते जवाहर गेट कडी रस्त्याचे एका बाजुस पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे.