नवी दिल्ली : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदरांजली अर्पण केलीय. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर फोटोसह श्रद्धांजली संदेश जारी केला आहे.
गांधींच्या १५५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यासंदर्भातील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, सर्व देशवासियांच्या वतीने आम्ही आदरणीय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. यासोबतच मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली.
विजय घाट या शास्त्रींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून शास्त्रींना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, ‘माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.