विशेष- लता गुठे
कालचीच गोष्ट…
“माझ्याच नशिबाला ही अशी सगळी माणसं का यावीत?”
“काय झालं काका?” मी सहज विचारलं,
“कार्ट गावभर उकिरडे फुंकत फिरतंय आणि बायको आठ दिवसांपासून माहेरी जाऊन बसलीय. पोरी तू तरी सांग, मी काय- काय करू? घरातलं पाहू की बाहेरचं.” काका वैतागून म्हणाले.
“याचा दोष तुम्ही नशिबाला का देताय काका?
अहो काकुची आई आजारी आहे.”
माझं वाक्य संपायच्या आतच काका मानवत घरात निघून गेले. आणि माझे विचार नशीब या शब्दाच्या बाजूने घिरट्या घेऊ लागले.
नशीब म्हणजे नेमके काय? मी मलाच प्रश्न विचारला… आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक कृती मागे विचार असतो मग हे नशीब काय काम करत असेल तर… आपण अनेकदा म्हणतो, माझ्या नशिबात काय आहे ते मला नाही माहीत. जे नशिबात आहे तेच होणार, नशिबाच्या पुढे मला जाता येणार नाही. जर असं असेल तर, मग त्याचा इतका बाऊ कशासाठी करून घ्यायचा? उद्या काय होईल ते होईल आजचा दिवस आजचा क्षण कशासाठी खराब करायचा?
प्रयत्न करणारच नशीब साथ देतं. हे माझ्या अनुभवातून मी ठामपणे सांगू शकते. नशिबात काय आहे ते मी सांगू शकत नाही; परंतु माझे सुख कशात आहे. माझ्या इच्छा आकांक्षा काय आहे. माझे ध्येय साध्य करण्यासाठी मला काय केले पाहिजे या गोष्टींचा जर विचार केला, तर आपण नशिबाला ना दोष देणार ना त्याच्यावर अवलंबून राहणार. आणि जर नशीब कोणी बदलू शकत नसेल तर मग… जे समोर येईल त्या वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.
नशीब नशिबाला आपण अनेक समानार्थी शब्द वापरतो. कधी त्याला प्रारब्ध म्हणतो तर कधी दैव… नशिबाचा संदर्भात अनेक वाक्प्रचार नेहमी ऐकायला मिळतात ते म्हणजे… नशीब उघडणे, भाग्य उदयाला येणे, चांगले दिवस प्राप्त होणे, नशीब फुटणे वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे सुदैव दुर्दैव भाग्यवान असेही शब्द आपण अनेकदा वापरतो. कधी कधी सहज म्हणून जातो किती भाग्यवान आहे तो. यश मिळायला नशिबाची साथ हवी ना? नशिबात असेल ते मिळेल…
मित्रांनो जी माणसे असा विचार करतात ते यशापासून कोसो दूर राहतात. खरे तर ही झाली आपण शोधलेली पळवाट. अपयशाचे खापर नशिबावर फोडण्याची सवय लागलेली असते. ही सवय अतिशय घातक आहे. फक्त कर्मावर नशीब बदलणे अवलंबून असते. चांगली कर्म करतात, सतत कष्ट करतात, चांगले विचार करतात, मोठे स्वप्न पाहतात अशांनाच नशीब साथ देते. एका हिंदी कवीच्या नशिबाविषयीच्या कविता मला फार आवडतात त्या अशा…
खुदा तौफीक देता है जिन्हें वो ये समझते हैं.
की खुद अपने ही हाथों से बना करती हैं तकदीरें
आपले भाग्य बदलण्याचे संपूर्णपणे आपल्याच हातात आहे. विधाता नशिबात काहीही लिहून पाठवत नाही. विधाता म्हणजे काल्पनिक गोष्ट आहे. त्या गोष्टीचा बाऊ न करता त्याला समोर येणारे वास्तव स्वीकारले की, समस्यांवर मार्ग मिळतो.
कभी मैं अपने हाथों की लकीरों से नहीं उलझा
मुझे मालूम है किस्मत का लिखां भी बदलता है
असे बशीर बद्र या कवीने म्हटले आहे.
यश-अपयश हे फक्त आपण केलेल्या चुका आणि घेतलेले निर्णय किती योग्य किंवा अयोग्य होते यावर अवलंबून आहे. कर्मावर विश्वास असणारी माणसे नशिबाच्या नावाने पळवाट काढत नाहीत. ते स्वत:च्या निर्णयावर जास्त विश्वास ठेवतात. निर्णय घेणे हे केवळ आपल्याच हातात असते. घेतलेले योग्य निर्णय आपले भाग्य बदलू शकतात. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची मनाला आणि बुद्धीला सवय लावली तर, भाग्योदय व्हायला वेळ लागत नाही. आणि एका कवीने जे म्हटले आहे ते खूप विचार करण्यासारखे आहे. तो म्हणतो,
कधी मागितलं नाही काही
म्हणून काय तू द्यायच विसरून गेलास
आणि जे हवं होतं
त्यापेक्षा जास्त घेऊन गेलास
खरंच तू आहेस का?
की भ्रम आहे सगळा
हातावरच्या रेषा फक्त रेषा असतात
की असतो त्यात अर्थ वेगळा
आणि असेलच त्यात तू “नशीबा”
तर आजच
मिटवतो त्या रेषांना
ज्यांनी खूप सतावलय
माणसासारखा मित्र, प्राणी दुसरा कुठलाच नाही. कायम त्याच्या डोक्यावर कुठल्या ना कुठल्या भीतीचे सावट लटकत असतं. आणि माणसाचा दुसरा स्वभाव असा असतो. चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट झालं तर नशिबाने झालं. अपयश हे दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडून पुसून टाकण्याकडे जास्त फल असतो. म्हणून नशिबाची मध्यस्ती करून स्वतःचे तात्पुरते समाधान करून घेतो.
माझ्याच एका कवितेमध्ये मी म्हटलं आहे…
सुख-दुःखाच्या ऊन पावसात
मनमुराद भिजले
अंधार पसरला भोवती
तेव्हा कळलं…
आतमध्ये दिवली जागी आहे
तिने दिली पहाटेपर्यंत सोबत
अन् दिवसाचं सोनं
हवं तेवढं लुटलं
तेव्हा नशिबाने आनंदून म्हटलं
मला आवडेल तुझ्याशी मैत्री करायला