लखपती दीदी संमेलनात होणार सहभागी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते जळगावमध्ये लखपती दीदी संमेलनात सहभागी होतील. तसेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत. सकाळी ११.१५ वाजता ते जळगावमध्ये लखपती दीदी संमेलनात सहभागी होतील. तर दुपारी साडेचार वाजता, जोधपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान प्रमुख पाहुणे असतील. जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाच्या संग्रहालयाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकतेच लखपती झालेल्या ११ लाख नवीन लखपती दीदींचा कार्यक्रम जळगावमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप आणि सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान देशभरातील लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते ५ हजार कोटींचे बँक कर्ज वाटप
या कार्यक्रमात पंतप्रधान अडीच हजार कोटी रुपयांचा निधी जारी करतील. या निधीमुळे ४.३ लाख स्वयं-सहायता गटांच्या सुमारे ४८ लाख सदस्यांना फायदा होईल. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते ५ हजार कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले जाणार आहे. या कर्जाचा फायदा २ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त बचत गटांच्या २५.८ लाख सदस्यांना होईल. लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. सरकारने ३ कोटी लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.