निसर्गवेद- डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
ॲमेझॉनच्या जंगलात दोन प्रकारच्या मधमाश्या आहेत एक डंख मारणारी, दुसरी डंखरहित. बहुतेक करून मधमाश्यांच्या कॉलनी असतात. वाळव्या लागलेल्या पोकळ झाडांमध्ये सुद्धा मधमाश्यांची वस्ती असते. कामगार मधमाश्या पाच ते सात आठवडे तर राणीमाशी पाच वर्ष एवढे यांचे आयुर्मान असते. मधमाश्यांच्या पोळ्याचे माप १.५ मीटर रुंदी आणि १ मीटर खोली असते. बॉम्ब ट्रॅवर्सालिस मधमाश्या यांच्या पोळ्याच्या प्रवेशद्वारावर काही मधमाश्या रक्षक म्हणून कार्य करतात. ऑर्किड मधमाशी हिच्या जवळजवळ २०० प्रजाती आहेत. लांब आणि पातळ जिभेची चमकत्या रंगाची अशी ही मधमाशी एकटीच राहते. बकेट मार्केट नामक फुलांमध्ये आकर्षित होऊन ही त्या फुलातील रस घेण्यासाठी जेव्हा जाते, तेव्हा या फुलांमधील रसासोबत अतिशय विस्तीर्ण पद्धतीने पराग कणांचा प्रसार करते. डंख नसलेली मधमाशी तिच्या जवळ जवळ ५०० प्रजाती आहेत. आणि या वर्षावणांमध्ये खूप मध उत्पादन करतात. यांच्यात डंख मारायची क्षमता नसते; परंतु त्या चावतात. जंगलातील आद्रता शोषण्याचे कार्य या मधमाश्यांची पोळी करतात. एक गोष्ट सर्वांच्याच लक्षात आली असेल की, जंगलातील हे जीवनचक्र संतुलित करण्यात कीटक केवढा मोठा हातभार लावतात. अन्नसाखळीत हे माकडांचे, पक्ष्यांचे खाद्य असणारे कीटक.
तसेच वाळवीच्या जवळजवळ ३००० जाती ज्ञात असलेल्या आफ्रिकामध्ये आढळतात. हे वर्षावन असल्यामुळे तेथे वृक्ष वनस्पतींची संख्या जास्त प्रमाणात आहे. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा, जमिनीत नमी ठेवण्याचे कार्य या वाळवी करतात. त्यामुळे वृक्ष, वनस्पतींच्या वाढीस मदत होते. ३६०० ज्ञात असलेल्या कोळ्यांच्या प्रजाती आहेत. अजस्त्र मॅमोथ कोळी याचे उंदीर, बेडूक हे खाद्य. येथील कोळी हे फुलपाखरापासून मोठ्या पक्ष्यांपर्यंत सर्व काही खाणारे आहेत. जगातला सगळ्यात मोठा कोळी हा अॅमेझॉनमध्ये आढळतो. असे म्हणतात की, टारेंट्युला हा कोळी डायनासॉर पासून आहे. याचे आयुष्य ३० वर्षांपर्यत असते. जास्तीत जास्त याची लांबी १३ इंच असते; परंतु तरी हा विषारी नसतो. हे काळ्या रंगाचे असून त्यांच्या शरीरावर काळ्या, तपकिरी रंगाचे खूप मोठे केस असतात. यांचे पाय बारा इंचापर्यंत पसरू शकतात. काही जमाती याला खातात सुद्धा. उड्या मारणारा कोळी हा अत्यंत छोटा असतो आणि वर्षावनात छतावर राहतो. याच्या पाचशे प्रजाती ज्ञात आहेत. हा अजिबात हानिकारक नाही. वांडरिंग स्पायडर हा अत्यंत विषारी आणि आक्रमक आहे जर हा चावला आणि जर योग्यवेळी त्यावर औषध उपचार नाही झाले तर, २५ मिनिटांत आपल्याला मृत्यू येऊ शकतो. बहुतेक करून हे केळ्याच्या घडामध्ये सुद्धा राहतात. वटवाघूळ, किडे, साप, कीटक हे यांचे खाद्य. हमिंगबर्ड पक्षी सुद्धा खाताना हा निदर्शनास आला आहे. काही कोळी प्रजातींमध्ये नर मादीच्या संबंधानंतर मादी नराला खाऊन टाकते. गोलियत हा कोळी खाणारा पक्षी आहे. कधी कधी याचे टोकेरी दात १.५ इंच लांब असतात. पण तरी हा विषारी नाही. मासे पकडणारा कोळी, नकली कोळी अशा अनेक विषारी, बिनविषारी प्रजाती या जंगलात आहेत. जवळ जवळ सहा फुटाचा कोळी सुद्धा जंगलात आढळतो. आदिवासी मुलांना बऱ्याचदा या कोळीने स्वतःची शिकार बनवलेले आहे असे म्हटले जाते.
लीफहॉपर लिम्फ हा कीटक तर असे वाटते की, एखाद्या परग्रहावरून आलेला आहे की काय. जर शिकारीने हल्ला केला तर हा आपले शरीर सर्व दिशेने फिरवतो. मैंटिस याच्या अनेक प्रजाती आहेत जसे प्रार्थना करणारे, युनिकॉर्न. हे आपल्या शिकाऱ्याला चकवा देणारे असतात. खूप शांतपणे उभे राहतात; परंतु शिकारी आला की विजेच्या वेगाने अचानक आक्रमण करतात. कीटकांमधून होणारा स्त्राव बऱ्याच वनस्पतींना सुद्धा घातक असतो. या विषारी कीटकांच्या स्त्रावांमुळे झाडांची पाने सुकतात.
या कीटकांचे निरीक्षण करत असताना मी मजेशीर गोष्टी पाहिल्या. जसं जेवल्यावर आपण आपले हात धुतो तसेच हे कीटक सुद्धा त्यांची सोंड पायाने पुसताना अनेक वेळा दिसतात. म्हणजे त्यांना किती स्वच्छता लागते. ते नृत्य सुद्धा करतात. कधी गोल गोल फिरून तर कधी मागचे पुढचे पाय उडवून, कधी सोंड किंवा पायाने टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करतात, पंख फडफडवून, शेपटीचा भाग हलवून, डोके वर खाली घेऊन, झाडांच्या पानांवर डहाळींवर उलट-सुलट चालत असतात. हे असे नृत्य नर मादीला पाहून सुद्धा करतात बर का. अगदी सूक्ष्म मधील सूक्ष्म जरी कीटकांचा आपण फोटो जर झूम मध्ये पाहिला तर, आपल्याला दिसून येतं की, त्यांच्या त्वचेवर, पंखावर असंख्य केशरचना आणि सूक्ष्म पोतयुक्त रचना आहेत. खरंच या रहस्यमय कलेचं आपण वर्णन करू शकतच नाही.
अत्यंत विषारी असणारे कीटक हे बहुतेक करून गडद रंगाचे असतात. काही कीटक तर झाडांमध्ये अजिबात दिसत नाही. फुलपाखरांसारखेच हे सुद्धा सुकलेल्या पालापाचोळ्यांसारखे, पानांसारखे, दगडांसारखे इतकच काय तर पशुपक्ष्यांसारखे सुद्धा असतात. अगदी निसर्गात स्वतःला सामावून घेणारे. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने ते स्वतः सारख्या दिसणाऱ्या रंगांच्या पानांवर, डहाळ्यांवरच विसावतात. म्हणूनच हे कीटक आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. गंमत म्हणजे या किड्यांमध्ये मादी अतिशय आक्रमक असते. काही कीटकं अशी असतात की अचानकपणे ते त्यांचे आकार बदलतात. इथे एक अजब कीटक आहे. शेंगदाण्याच्या टरफलासारखा दिसतो परंतु; शत्रू आला की तो आपले पंख उघडतो आणि त्याचे पंख जग्वारच्या नक्षीचे आणि रंगाचे दिसायला लागतात, त्यावर दोन लाल मोठे पट्टे असतात. आपल्या नजरेला धोका देणाऱ्या परंतु; नैसर्गिक संवर्धन करणाऱ्या या कीटकांच्या अद्भुत रचना खरंच अद्वितीय आहेत. गंमत म्हणजे प्रत्येकाच्या शिकारीच्या तऱ्हा खूप वेगळ्या आहेत आणि ध्वनी तर खूपच विविध पद्धतीने काढतात. कधी तोंडातून ध्वनी येतो, कधी पंखातून, कधी पायांच्या घर्षणाने तर कधी सोंडेतून. खर तर यांची माहिती घेऊ तेवढी कमीच आहे.
या कीटकांचा ध्वनी सुद्धा खूप विविध प्रकारचा असतो जो आपण कानांनी सहज ऐकू शकत नाही. चालताना, पंख फडफडवताना, खाताना, संवाद साधताना यांच्या आवाजाचे परीक्षण करण्यात आले. येथील जंगलात काहीतरी विचित्र ध्वनी येत असतो, ज्याचे रेकॉर्डिंग २००५ मध्ये झाले. अज्ञात प्रजातींचा हा ध्वनी असावा किंवा नैसर्गिक घडामोडींचा. जसे ज्वालामुखीमुळे होत असलेल्या भूगर्भातील हालचाली असे वैज्ञानिकांचे मत पडले परंतु; माझ्या मते हा तेथील जीवसृष्टीतील असलेल्या सूक्ष्म जीवांपासून ते विशालकाय प्राण्यांपर्यंत एकत्रित झालेला ध्वनी असावा. कारण या जंगलात असलेला प्रत्येक जीव एक विशिष्ट ध्वनी काढत आहे. या सूक्ष्म जीवांचे आणि कीटकांचे आवाज सुद्धा पशुपक्ष्यांसारखेच असतात. परंतु ते खूप भयंकर वाटतात. बहुतेक म्हणूनच परमेश्वरांने या अद्भुत शक्तीने या कीटकांचा ध्वनी सूक्ष्म ठेवला असावा नाहीतर, या परिसरात भयंकर आवाजाचा दंगाच उसळला असता.
खरंच परमेश्वराने जीवसृष्टीतील प्रत्येक घटकाला त्याचे कार्य दिले आहे. आणि प्रत्येक घटक ते कार्य योग्य पद्धतीने करतोच मानव सोडून. या कीटकांशिवाय हे वातावरण असू शकेल का? अॅमेझॉनमधील कीटक हे नैसर्गिकरित्या खूप महत्त्वाचे कार्य करते. माती भुसभुशीत करून त्याला हवा देणे, जमिनीत ओलावा ठेवणे, विशेषतः परागकण प्रसारित करून जंगलाच्या सौंदर्यकरणात आणि संवर्धनात फार मोलाचे कार्य करतात. परागकणांचा प्रसार करणारे हे कीटक दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील त्यांचे कार्य अद्भुत उर्जेने भरलेले आहे. पंचतत्त्व संतुलित करण्याची महत्त्वाची भूमिका हे बजावतात. आश्चर्य या गोष्टीच वाटतं की वातावरणानुसार सर्व जीवांची उत्पत्ती होऊ शकते; परंतु नैसर्गिक रचनेनुसार सुद्धा त्यांची उत्पत्ती करणं, त्यांचे शारीरिक संतुलन करणे खरंच या अद्भुत रचनेचा अभ्यास करताना ही गुढ न उकलण्यासारखेच वाटते.
या जीवसृष्टीतील घटक जसजसे मानव स्वतःच्या कर्माने नामशेष करेल तस तसे मानवालाही एक दिवस जगणे असह्य होईल. एक दिवस असा येईल की, नैसर्गिक आपत्ती सोबतच या सर्व जीवांनी मानवावर हल्ला केला तर… काय होईल? आपल्या कर्माने ती वेळ आपणच आपल्यावर आणू शकतो. हे विश्व नैसर्गिकपणे संतुलित करण्यासाठी या सूक्ष्म जीवांचे मौलिक कार्य आहे. त्यामुळे यांच्याशिवाय हे विश्व खरंच अधुरं आहे. अॅमेझॉनच्या किंवा कोणत्याही जंगलातील ही मौलिक विश्वसंपत्ती संवर्धन आणि संरक्षण ही मानवाची जबाबदारी आहे.
[email protected]