सफाळे : सफाळे पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक पत्रकार आदींसोबत मी नाळ बांधण्याचा प्रयत्न केला. कारण जोवर जनतेची साथ मिळत नाही तोवर कुठलाच पोलीस अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही असे, मत सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी व्यक्त केले. कासा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची बदली झाल्याने पोलीस स्टेशन कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी पो. नि. मांदळे बोलत होते.
आपल्या निरोप समारंभात ते पुढे म्हणाले की, पोलीस स्टेशनमधील एक वर्ष १४ दिवसांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था तसेच कोणताही राजकीय वादविवाद होऊ दिला नाही. “जीवनात प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीना काही शिकवून जातो असे सांगतानाच त्यांनी निवडणूक या तात्पुरत्या काळापुरता असतात त्यावेळेत कोणीही आपसातील हेवेदावे टाळून शांततेत निवडणूक पार पाडाव्यात अशा सूचना देखील केल्या.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील, काँग्रेसचे नेते सिकंदर शेख, पोलीस पाटील केतन पाटील, जेष्ठ नागरिक भिका सोनवणे, इंद्रमल जैन, पोलीस कर्मचारी कैलास शेळके आणि बांगर या सर्वांनी साश्रू नयनांनी पो.नि. मांदळे यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश किणी यांनी केले.