Wednesday, June 18, 2025

गणेशोत्सवासाठी दिलासा; मांडवा-गेटवे जलवाहतूक १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

गणेशोत्सवासाठी दिलासा; मांडवा-गेटवे जलवाहतूक १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

मुंबई : मांडवा ते मुंबई (गेटवे ऑफ इंडिया) दरम्यानची फेरी सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. मान्सून काळात खवळलेल्या समुद्रामुळे ही सेवा २६ मेपासून बंद करण्यात आली होती. या सेवेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


प्रत्येक वर्षी पावसाळ्यात समुद्रातील अनिश्चित स्थितीमुळे ही जलवाहतूक सेवा बंद ठेवावी लागते. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतरच महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतो. मांडवा ते गेटवे या मार्गावर पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो या कंपन्यांच्या फेरीबोटी चालतात. या जलमार्गावर दरवर्षी सुमारे १५ लाख प्रवासी प्रवास करतात.


फेरीबोटींच्या दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी आवश्यक तपासण्या पूर्ण करूनच या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने या सेवेमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास अधिक सोयीचा होईल. त्याचबरोबर पर्यटकांची संख्या वाढून अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांवरही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.


मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग विशेषतः मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना जलमार्गातून आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा लाभ घेता येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या सेवेला सुरुवात होणार असल्याने कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होईल.

Comments
Add Comment