मुंबई:भारतीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना ८ नोव्हेंबरला हॉलिवूडबेट्स किंग्समीड स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संयुक्त विधानादरम्यान ही घोषणा केली.
दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाच्या विधानानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ८ नोव्हेंबरला डर्बनमध्ये किंग्समीड स्टेडियममध्ये सुरू होईल. त्यानंतर १० नोव्हेंबरला गक्बेरहामध्ये दुसरा टी-२० सामना, १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये तिसरा टी-२० सामना, १५ नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये चौथा आणि शेवटचा टी-२० सामना खेळवला जात आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नेहमी मजबूत नाते राहिले आहे. या नात्यावर दोन्ही देशांना गर्व आहे. भारतीय क्रिकेट संघाला नेहमीच दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे आणि असेच प्रेम भारतीय चाहतेही दक्षिण आफ्रिकेच्या संघाप्रती दाखवतात.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना ८ नोव्हेंबर – हॉलीवूडबेट्स किंग्समीड स्टेडियम
दुसरा टी-२० सामना १० नोव्हेंबर – डॅफाबेट सेंट जॉर्ज पार्क
तिसरा टी-२० सामना १३ नोव्हेंबर – सुपरस्पोर्ट पार्क
चौथा टी-२० सामना १५ नोव्हेंबर – डीपी वर्ल्ड वांडरर्स
द. आफ्रिका दौऱ्याआधी या देशांसोबत खेळणार टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय क्रिकेट संघ बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात २ कसोटी सामने खेळवले जातील. हे सामने चेन्नई आणि कानपूरमध्ये होतील. तेथे ६ ते १२ ऑक्टोबरदरम्यान दोन्ही संघ ३ टी-२० सामने खेळतील. हे ३ टी-२० सामने अनुक्रमे धरमशाला, दिल्ली आणि हैदराबादमध्ये होतील.
बांगलादेशविरुद्धची मालिका संपल्यानंतर ४ दिवसांनी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. किवी संघ १६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत भारतासोबत ३ कसोटी सामने खेळेल. पहिला सामना बंगळुरू, दुसरा पुणे आणि तिसरा कसोटी सामना मुंबईत खेळवला जाईल.