Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीनागरिकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा – जिल्हा निवडणूक...

नागरिकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने मतदान करण्यासाठी सर्व यंत्रणांनी तयार केलेल्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून घ्यावा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे प्रमुख समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी किरण महाजन, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, समितीचे समन्वयक डॉ. सुभाष दळवी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले की, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ही भावना मतदारांमध्ये रुजवीत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व विभागांनी आपला कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यानुसार या जनजागृती अभियानाला गती देत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्याला मतदानासाठी प्रवृत्त करावे. मतदार जनजागृती अभियानाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल. मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर आहे. तथापि, लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करावयाचे असेल, तर मतदारांना २४ एप्रिल २०२४ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत तेथील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच नागरिक सोशल मीडियावर मोठ्या संख्येने सक्रिय असतात. या संधीचा प्रशासकीय यंत्रणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उपयोग करून घ्यावा. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी महाजन, डॉ. दळवी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -