Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीCleanup Marshal: स्वच्छतेचे नियम मोडणारे मोबाईलवर झळकणार!

Cleanup Marshal: स्वच्छतेचे नियम मोडणारे मोबाईलवर झळकणार!

क्लीन अप मार्शल आता ऑनलाईन कारवाई करणार

मुंबई : प्रदूषणमुक्तीसाठी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागात स्वच्छतेचे पालन करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाते. मात्र तरीही अनेक लोकांकडून स्वच्छतेचे पालन होत नसल्यामुळे महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापुढे शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी शहरात क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे अस्वच्छता करणाऱ्यांवर चाप लागेल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

मंगळवारपासून पालिकेच्या ‘ए’ विभागात स्वच्छतेसंदर्भातील प्रकल्प सुरु करण्यात आला असून आता स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार आहे. प्रशिक्षित क्लिन अप मार्शल कारवाई करताना आकारलेल्या दंडाची पावती हाताने न लिहिता मोबाईल ऍपद्वारे छापील पावती देणार आहेत. तसेच, नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने दंड भरण्याचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

माहिती तंत्रज्ञानावर आधारित दंडात्मक आकारणीची सुरुवात क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. स्वच्छताविषयक नियमांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक वसूलीसाठी डिजीटल व ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही करण्याचे मोबाईल ऍप महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० याप्रमाणे संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ७०० क्लीन अप मार्शल कार्यरत आहेत. या सर्वांना प्रशिक्षण देऊन प्रायोगिक तत्त्वावर डिजीटल कारवाई सुरु करण्यात येणार आहे. तसेच, कार्यवाही डिजीटल झाल्यामुळे महानगरपालिकेला कोणत्या दिवशी किती रक्कम दंड आकारणी झाली, कोणत्या जागेवर, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारासाठी दंड आकारणी झाली, याचे अचूक तपशील कळू शकतील.

नागरिकांना मिळालेल्या पावतीवर महानगरपालिकेचे बोधचिन्ह तसेच पावती क्रमांक असेल. महानगरपालिकेच्या विभागाचे नाव, दिनांक, वेळ तसेच कारवाई केलेल्या जागेचा अक्षांश, रेखांशदेखील असेल. परिणामी, दंड आकारणी प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखले जातील. तसेच, नागरिक आणि मार्शल यांच्यातील वादाचे प्रसंगही टळतील. क्लीन अप मार्शलकडे असलेल्या मोबाईलमध्ये महानगरपालिकेने तयार केलेले क्लीन अप मार्शल सिस्टीम ऍप असेल. यामध्ये स्वच्छतेचे नियम मोडल्याबद्दल आकारावयाची निश्चित रक्कम आधीपासूनच समाविष्ट असेल. सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे १०० ते १ हजार रूपये इतका दंड आकारण्याचे अधिकार क्लिन अप मार्शल यांना असणार आहेत. नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -