मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या स्त्री प्रधान सिनेमांची चलती आहे. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तर आता परेश मोकाशी दिग्दर्शित स्त्रियांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर आणि गमतीजमतींवर आधारित ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात नम्रता अन् मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली होती. आता या सिनेमाचा टीझरही रिलीज झाला आहे.
“प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते” या संवादाने सुरुवात झालेल्या टीझर पाहून प्रेक्षकांनी वाहवाह केली आहे. नोकरी करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात कुटुंबासोबतच मदतनीस म्हणजेच कामवाली बाई देखील तितकीच महत्त्वाची असते… तिचं घरात असणं, नसणं…याभोवती कथानक फिरताना टीझरमध्ये दिसतं. मुक्ता , सारंग हे नवरा बायको आहेत. तर बालकलाकार मायरा त्यांची मुलगी आहे. तर नम्रता आवटे या सिनेमात कामवाली बाईच्या भूमिकेत आहे. यांच्या घरात घडणारे धम्माल किस्से ‘नाच गं घुमा’च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
जर एखादी स्त्री तिच्या घरची ‘राणी’ असेल, तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी ‘परीराणी’च्या रुपात समोर येते असं या चित्रपटाचं आगळंवेगळं कथानक आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि व चि सौ कां’, ‘आत्मपॅम्प्लेट’ आणि ‘वाळवी’नंतर आता परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत. टीझरचं इतका हिट झाला आहे तर चित्रपट किती हिट होईल याचीही सर्वांना उत्सुक्ता लागली आहे.