मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
मुंबई : मुंब्रा शाखेवरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले. पण शिवसैनिकांचे फटाके असे वाजले की काही फुसके बार न वाजताच निघून गेले, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चांगलेच फटकारले.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा येथे जाऊन शाखेची पाहणी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक शब्दांत टीका केली. दिवाळी आहे, जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, शहरात काही फुसके बार आले होते जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की त्यांना माघार घ्यावी लागली, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.
ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शिवसेना शाखा आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ताब्यात घेऊन जमीनदोस्त केल्याने या शाखेच्या जागेला भेट देण्याकरिता उद्धव ठाकरे दिवाळीत नेत्यांसह शिवसैनिकांचा फौजफाटा घेऊन मुंबईहून दाखल झाले. परंतू शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत ‘कलानगर वापस चले जाओ’, अशी घोषणाबाजी केली. यामुळे सुमारे तासभर मुंब्रा परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे दिवाळीत शिमगोत्सवाचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आपले सणदेखील तोच संदेश देतात. म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया. सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा सर्वांची आहे, हे लक्षात ठेवून सण साजरा करूया. शिवछत्रपतींचा, जिजाऊ माँसाहेब यांचा हा महाराष्ट्र केवळ देशातील अन्य राज्यांसाठी नव्हे, तर जगाने दखल घ्यावी अशी गौरवपूर्ण वाटचाल करीत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.