नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानातील (Pakistan) अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. कराचीपासून २७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या स्थानकाजवळ रावळपिंडीला जाणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे (Hajara Express) दहा डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघाताची (Accident) तीव्रता इतकी भीषण होती की आतापर्यंत या अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास ८० जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात हा अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये जखमी झालेल्या लोकांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरु असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे.
या अपघाताची तीव्रता जास्त जरी असली तरी या अपघातामगाचं नेमंक कारण अद्याप अस्पष्टच आहे. दरम्यान पाकिस्तानचे रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफीक यांनी हा अपघात कोणीतरी मुद्दाम घडवून आणल्याचा धक्कादायक दावा पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तसेच त्यांनी तांत्रिक बिघाडामुळेही हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु याचे ठोस कारण अजूनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पाकिस्तानचे लष्करी पथक देखील बचावकार्यात सहभागी झाले आहे. या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प असून रुळावरुन डबे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.