छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात होर्डींगबाजी हा चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यातच आता आणखी एका होर्डिंगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचे (Harshvardhan Jadhav) वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेले होर्डिंग चर्चेचा मुद्दा ठरत आहे. बीआरएस पक्षाचा उल्लेख करत भावी खासदार म्हणून हर्षवर्धन जाधव यांचा होर्डिंगवर उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे बीआरएसकडून संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याच्या राजकारणात पाय रोवत असलेल्या भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात भावी खासदार हर्षवर्धन जाधव या आशयाचे बॅनर झळकले आहेत. यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव हे लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू झालीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेले हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल २ लाख ८३ हजाराहून अधिक मत घेत चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. आगामी लोकसभा निवडणुकीतही ते उभे राहिल्यास लोकसभा निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे दिसेल यात शंका नाही.