-
दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
महात्मा फुलेंनी सावित्री माईस शिकवले आणि सावित्री माईंमुळे भारतातल्या स्त्रिया शिकल्या. आज भारतीय स्त्री सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे. इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान, तर प्रतिभा पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. इंद्रा नुयी या तर पेप्सिकोसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या. कल्पना चावला अंतराळवीर बनून जगातील मुलींसाठी प्रेरणा ठरली. या सगळ्या खऱ्या अर्थाने ‘सावित्रीच्या लेकी’ ठरल्या. याच मांदियाळीत त्यांचादेखील समावेश ठरतो. सावित्री माईंचा वारसा जोपासत त्या शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करत आहेत. आदर्श पिढी घडविणाऱ्या या आदर्श शिक्षिका म्हणजे प्रतिमा गुप्ते. (Pratima Gupte)
शैक्षणिक क्षेत्राविषयी आवड निर्माण होण्यासाठी प्रतिमाताईंना घरातूनच बाळकडू मिळालेलं आहे. घरातील वातावरणामुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली. प्रतिमाताईंचे आजोबा मनोहर प्रधान हे एक प्रतिष्ठित शिक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले. शिक्षणासोबत जीवनमूल्य शिकवले. त्यामुळे सतत घरी विद्यार्थ्यांची रेलचेल असायची. त्यातून सतत रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत होते. तसेच आई-वडील या दोघांनाही वाचनाची आवड असल्याने घरात विद्यार्थ्यांची रेलचेल, तर पुस्तकांनी कपाट भरलेले असायचे. हीच आवड प्रतिमाताईंनी देखील आत्मसात केली. चांगली पुस्तके वाचायची, चांगले विचार थोरामोठ्यांकडून आत्मसात करायचे, हे गुण त्यांच्यामध्ये विकसित झाले.
प्रतिमाताईंनी इंग्रजी साहित्यातून ‘एमए’ची पदवी संपादन केली आहे. एमए इन इंडोलॉजीदेखील केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. सुरुवात त्यांनी नर्सरी टीचर म्हणून केली होती. एकेक पायरी चढत आज लिओ इंटरनॅशनल स्कूलच्या त्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. “घेतलेल्या शिक्षणामुळे माझ्यात अनेक बदल घडले. ज्ञान वाढलं; परंतु या क्षेत्रात काम करताना शिक्षक ते शिक्षकतज्ज्ञ या प्रवासादरम्यान आलेल्या अडचणी, समोर आलेले प्रश्न, वेगवेगळ्या शाळांना दिलेली भेट, त्यातून प्रक्षिक्षित होत गेले” असे प्रतिमाताई सांगतात.
त्या सगळ्या अनुभवाचा वापर करत त्यांनी मॅकमिलन एज्युकेशन, इंडियन एक्स्प्रेसच्या क्विस्ट प्रोग्रामअंतर्गत, भारती भवन अशा विविध मंचावरून अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. वैयक्तिक स्तरावर देखील त्यांना अनेक शिक्षण संस्था प्रशिक्षणासाठी निमंत्रित करत असतात. गृहिणी व आई म्हणून असलेली जबाबदारी सांभाळत त्यांचा हा प्रवास सुरू होता.
एका नवीन विचारांची शाळा असावी, असे प्रतिमाताईंना नेहमी वाटे. उच्च शिक्षण मुलांना मिळावे, यासाठी आयजीसीएसई आधारित अभ्यासक्रमांतर्गत भिवंडी- काल्हेरसारख्या ठिकाणी त्यांनी हा प्रयत्न केला. २०११-२०१२ साली लिओ इंटरनॅशनल स्कूल सुरू झाली. ही शासन मान्यताप्राप्त शाळा असून, त्यास पहिली ते बारावीपर्यंत मान्यता आहे. वर्ग नर्सरी ते दहावीपर्यंत भरतात. शाळेचे अध्यक्ष मनोज जैन व विश्वस्त महेश जैन आहेत. या दोघांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी खंबीर साथ दिल्यामुळेच प्रतिमाताईंच्या स्वप्नांना दिशा मिळाली आणि भिवंडी- काल्हेरसारख्या भागात इंटरनॅशनल स्कूल उभे राहिले.
आयजीसीएसई आधारित अभ्यासक्रमाविषयी जनजागृती करण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी प्रतिमाताईंनी गावागावात जाऊन मुलांना प्रोत्साहित केले. पालकांची भेट घेतली. विविध गावांच्या सरपंच मंडळींच्या मदतीने गावकऱ्यांशी संपर्क साधला. शिक्षणाविषयी जनजागृती केली. भिवंडीमधील ७-८ गावांमध्ये जाऊन मुलांसोबत चर्चा केल्या. अनेक स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित केल्या. त्यावरून लक्षात आले की, या भागात मुलांमध्ये खूप क्षमता आहे. मात्र आयजीसीएसई आधारित अभ्यासक्रमाविषयी येथील लोकांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे सतत पालकांशी बोलणे, चर्चा करणे, अभ्यासक्रमाबत माहिती देणे प्रतिमाताईंनी सुरू ठेवले.
इंग्रजी भाषा मुलांना कळेल का? भाषेमुळे आमच्या मुलांचे गुण कमी होतील का? अशा भीतीने पालकांचा गोंधळ उडत होता.
भाषेच्या अडथळ्यामुळे मुले डगमगत होती. अशा वेळी मुलांच्या भवितव्याचा विचार करून लिओ इंटरनॅशनल स्कूलने मुलांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्लिश कोड एकत्र करून एक मॉड्युल तयार केले आणि ती पद्धत टीचर्स ट्रेनिंगमधून शिक्षकांना दिली. जेणेकरून इंग्रजी भाषेची भीती दूर होऊन त्यांना त्या भाषेची मैत्री होईपर्यंत संकल्पना ही त्यांच्या मातृभाषेतून समजवण्यास सुरुवात केली. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढायला लागला आणि त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यास सोप्प गेलं.
खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्र याचा सुंदर समागम असलेला नवीन अस्त्रोगमी नावाचा कार्यक्रम श्री मोहन हरखरेजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना खूप सोप्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात शिकवला जातो.
पाठ्यपुस्तकासोबत मुलांना मानवी मूल्य शिकवण, राष्ट्रहिताचा विचार रुजविण्याचा शाळा प्रयत्न करते. नृत्य, कला, क्रीडा सोबतच इतर अनेक गोष्टी शाळेत शिकवल्या जातात. संस्कृतबरोबर प्राकृतसारखी प्राचीन भाषा शिकवली जाते. दृकश्राव्य, आशय विश्लेषण, संशोधन, मुक्त कला आणि लेखन या पद्धतींचा शिकविण्यासाठी वापर केला जातो. क्रिटिकल थिंकिंग मुलांमध्ये विकसित करण्यासाठी विश्लेषण, मूल्यमापन, कारणभाव, निर्णय क्षमता, समस्या निवारण आदींची मदत घेतली जाते.
शाळेत साहित्य संघ आहे, ज्याचे उद्दिष्ट सार्वजनिक संभाषण, वाचन, लेखन आणि संशोधनात्मक यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे आहे. शाळेमध्ये प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्व विभाग असल्याने भारताच्या प्राचीन इतिहासाची ओळख होते. इतिहास या विषयाप्रति विशेष आवड आणि संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी हा प्रयास केला आहे.
ब्रह्मी आणि मोडी लिपींची ओळख करून देणारे अभ्यासक्रम देखील शाळेत राबविले जातात. भविष्यात भारतीय सैन्य वा पोलीस दलात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी तशा स्वरूपाचे प्रशिक्षण देणारी ‘प्रबळ छात्र सेना’ नावाची संस्था आहे.
शाळेतील मुलांनी आयआयटी मुंबई, एमसीसी, ठाकूर अभियांत्रिकी महाविद्यालय आणि हिंदुजासारख्या विख्यात संस्थांमध्ये आयोजित केलेल्या मॉडेल युनायटेड नेशन तथा युथ पार्लमेंटसारख्या कार्यक्रमांतर्गत भाग घेऊन अनेक परितोिषके मिळवली आहेत. दृष्टी, कृती आणि समाजभान या गुणांमुळेच आज प्रतिमा गुप्ते शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श ‘लेडी बॉस’ ठरल्या आहेत.