‘ग्लोबल चेस लीग’ स्पर्धा
नवी दिल्ली (वार्ताहर) : एफआयडीई २०२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलिस्ट इयान नेपोम्नियाच्ची ‘ग्लोबल चेस लीग’मध्ये बालन अलास्कन नाइट्स संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात महिला जागतिक रॅपिड चॅम्पियन चिनची टॅन झोंगी आणि उझबेकिस्तानचा युवा खेळाडू नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह यांचा समावेश आहे.
पुनित बालन ग्रुप (पीबीजी) च्या मालकीचा, बालन अलास्कन नाइट्स दुबई चेस अँड कल्चर क्लब येथे २१ जून ते २ जुलै या कालावधीत होणाऱ्या लीगमध्ये भाग घेणाऱ्या सहा फ्रँचायझींपैकी एक आहे.
आम्ही ग्लोबल चेस लीगबद्दल उत्साहित आहोत आणि जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आमच्याकडे तरुणाई आणि अनुभव यांचे उत्तम मिश्रण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच स्वत:ला सिद्ध केलेल्या उल्लेखनीय खेळाडूंसह संघ मजबूत दिसत आहे. या अव्वल खेळाडूंच्या लाइनअपसह लीगमध्ये नवीन उंची गाठण्याचा आणि ठसा उमटवण्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे,” असे पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले.
३२ वर्षीय रशियन नेपोम्नियाच्ची जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यासोबत २००४ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवणारा अझरबैजानचा अनुभवी तैमूर रादजाबोव्ह आणि १८ वर्षीय अब्दुसत्तोरोव्ह आहेत.
संघ : इयान नेपोम्नियाच्ची (रशिया), नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह (उझबेकिस्तान), तैमूर रादजाबोव्ह (अझरबैजान), रौनक साधवानी (भारत), टॅन झोंगी (चीन) आणि निनो बत्सियाश्विली (जॉर्जिया).