नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यांच्या सहाय्यकांचे आणि यूपीतील गोंडा जिल्ह्यातील त्याच्या निवासस्थानी काम करणाऱ्या तब्बल १२५ जणांचे जबाब यावेळी पोलिसांनी नोंदवले आहेत.
पोलिसांनी पीडित पैलवानांचा जबाब पुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार ब्रिजभूषण यांच्यावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे तपास पथक ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या घरी गेले होते. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस कोर्टात अहवाल सादर करणार आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदारांसह साक्षीदारांचे म्हणणे पडताळून पाहण्यासाठी ही चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणी तांत्रिक, डिजिटल आणि मॅन्युअल पुरावे गोळा करत आहेत. तपास पूर्ण होताच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.