सोशल मीडियावर व्हायरल झालेली जाहिरात दाखवून महाभरतीच्या नावाखाली ९०० ते १००० रुपये परीक्षा फी घेऊन युवकांची फसवणूक!
मुंबई : सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली तलाठी महाभरतीची ‘मेगा भरती, महाभरती’ या जाहिराती बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
२०१८ पासून मेगा भरती, महाभरतीच्या नावाखाली ७५ हजार जागांचे गाजर युवकांना दाखविले जात आहे. आज भरती होईल, उद्या भरती होईल या आशेने लाखो युवक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत.
सगळीकडे व्हॉट्सॲप, फेसबूकसारख्या सोशलमीडियाच्या माध्यमातून आणि खासगी वेबसाइटवर, बोगस जाहिरातींचा भडिमार सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने प्रारूप जाहिरातीचा नमुना प्रसिद्ध झाला असून, त्याद्वारे ४ हजार ६२५ तलाठ्यांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या mahabhumi.gov.in या साइटवर ही जाहिरात आल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
वास्तविक, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात या साइटवर उपलब्ध नाही. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात शासनाच्या वतीने प्रसिद्ध झाली नसल्याचे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.
मेगा भरतीच्या नावाखाली मागील शासनाने प्रत्येक उमेदवाराकडून ३५० ते ६०० रुपये फी घेऊन कोणतीही भरती केली नाही. तसेच यावेळीही महाभरतीच्या नावाखाली ९०० ते १००० रुपये परीक्षा फी घेऊन युवकांची फसवणूक केली जात आहे.