मुंबई : ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सकाळी (सोमवारी) निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
पेंटल गेल्या अनेक दिवसांपासून अंधेरी येथील रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी याबद्दलची माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर आज ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गुफी यांची प्रकृती बिघडली तेव्हा ते फरीदाबाद येथे होते. सुरुवातीला त्यांना तेथेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर तेथून त्यांना मुंबईला हलवण्यात आले.
अभिनेते गुफी पेंटल यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९४४ साली पंजाबच्या तरन तारन येथील एका शिख कुटुंबात झाला. अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. पण १९६२ मध्ये जेव्हा भारत आणि चीनमधील युद्ध सुरू झाले तेव्हा ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते, त्यावेळी महाविद्यालयांमधून सैन्यात थेट भरती झाली. गुफी यांना सैन्यात जायचे होते. म्हणून त्यांनी संधीचे सोने केले. त्यांची पोस्टिंग चीन सीमेवरील आर्मी आर्टिलरीमध्ये झाली होती.
गुफी यांनी सांगितले होते की, “सीमेवर टीव्ही किंवा रेडिओ करमणूकीसाठी नव्हते, म्हणूनच जवान रामलीला करायचे. मला सीतेची भूमिका मिळायची आणि रावणची भूमिका साकारणारा कलाकार स्कूटरवरुन माझे अपहरण करायचा.”
वयाच्या ४४ व्या वर्षी गुफी यांनी ‘महाभारत’ मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ‘महाभारत’ या मालिकेसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु केले होते. त्यानंतर त्यांना शकुनी मामाचा रोल ऑफर करण्यात आला. गुफी यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, “शकुनीच्या भूमिकेसाठी मी तीन जणांची निवड केली होती. दरम्यान, या कार्यक्रमाची पटकथा लिहिणारे राही मासूम रझा यांची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनीच मला शकुनीची भूमिका साकारण्याचा सल्ला दिला. २ ऑक्टोबर, १९८८ साली महाभारताचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला आणि २४ जून १९९० रोजी शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला. मी महाभारताच्या जवळपास ९४ एपिसोडमध्ये काम केले.”
त्यांनी आपल्या करिअरमध्ये १०० हून अधिक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.