भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून शहरात शंभरहून अधिक पोस्टर्स
पिंपरी-चिंचवड : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शहरे, महामार्गांना महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले. तसेच औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव तर वांद्रे-वरळी सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. यातच आता पिंपरी – चिंचवड शहराचं नाव बदलून ‘जिजाऊनगर’ ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. शहरातील विविध भागात पिंपरी-चिंचवड शहराचे जिजाऊ नगर नाव करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तशा आशयाचे शंभरहून अधिक पोस्टर्स पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या अशी मोहिम राबवण्यात आली आहे.
पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलण्याची चर्चा या अगोदर २००६ -०७ ला झाली होती. तशा बातम्या देखील छापून आल्या होत्या. पण स्थानिकांनी पिंपरी- चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शहरात नामकरणाची चर्चा रंगू लागली आहे.