मुंबई महानगरपालिकेचे कळकळीचे आवाहन
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला असून राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने मुंबईसाठी राखीव साठ्यातून पाणीसाठा मंजूर केला आहे. यामुळे पुढील अवघे २० दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. पाऊस लांबणीवर पडल्यास किंवा जून मध्ये पाऊस कमी झाल्यास मुंबईला पाणीबाणीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना जपून पाणी वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ११.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेकडून सरकारला अतिरिक्त पाण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा कमी झाल्याने महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईला मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी मुंबईसाठी द्यावे अशी विनंती केली होती. सध्याचा पाणी साठा पाहता पाटबंधारे विभाग/राज्य सरकार यांनी राखीव साठ्यातून पाणीसाठा मुंबईसाठी मंजूर केला आहे.