मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नक्की काय घडलं.. केंद्रात कोणाला मिळणार मंत्रीपद?
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी सध्या वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीतल्या वरिष्ठांशी चर्चा केली. यावेळी रात्रीची खलबतं नक्की काय झाली?
येत्या १९ जूनच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी किंवा राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्राच्या कॅबिनेटचा विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मंत्रीमंडळात कोणाला घ्यावे, महत्त्वाची खाते कोणाकडे असावी यावरूनही दिल्लीतल्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याचे समजते.
मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यास नाराजी वाढण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर मंत्री मंडळ विस्तार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रीय मंत्री अमित शाहांशी चर्चा केली. शिवसेनेच्या दोन खासदारांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर काल संध्याकाळी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास दोन तास चालू होती. त्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे या बैठकीत नेमके काय खलबत झाले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर झालेल्या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. दोनच दिवसापूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले होते. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामुळे बैठकीत नेमकी काय खलबते झाली याची जोरदार चर्चा आहे. या बैठकीला मुंबईतील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, १९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता आहे. काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. काल पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील कार्यक्रम आटोपून दिल्लीला रवाना झाले. रात्री १० वाजता उभय नेत्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तिघांमध्ये दीड तासांहून अधिक वेळ चर्चा झाली.