-
प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
‘अल्फ्रेड नोबेल’ हा संशोधक होता. शास्त्रज्ञ होता. त्यांनी दुसऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नाही. जनसमुदायाचे मत ग्राह्य धरले आणि त्यामुळे तो अजरामर झाला.
प्रत्येक माणसाला वाटते की, सर्वांनी आपल्याला चांगले म्हटले पाहिजे. पण, लोक ‘चांगले’ म्हणण्यासाठी आपल्यात खरोखरी चांगले गुण आहेत का? याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्या कानी इकडून तिकडून काही गोष्टी येतातच. आपली पाठ फिरताच लोक काहीबाही बोलतातच! आपल्यासमोर आपल्याला कोणीच कधी वाईट बोलत नाही, मग आपल्याविषयी कोणी वाईट बोलत असेल, तर ते आपल्याला कसे कळेल बरे? याविषयीची एक ऐकलेली छोटीशी कथा सांगते –
अल्फ्रेड नोबेल यांनी स्फोटकांचा शोध लावला. तो खूप लोकप्रिय होता. खूप पैसा मिळवला. त्याने आपल्या मृत्यूची खोटी बातमी वृत्तपत्रात छापून आणली. कारण लोक त्याच्याविषयी काय बोलतील याविषयी त्याला कुतूहल होते. लोकांनी आणि वृत्तपत्रांनी सडकून टीका केली. लोकांना मारून त्याने पैसा कमवला… हजारो जणांच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे… तो मानवतेला कलंक आहे. ही टीका त्याच्या डोक्यात गेली आणि त्याने विचार केला की मला पैसा नको, लोकांनी मला चांगले म्हटले पाहिजे आणि त्यांनी स्फोटकांची निर्मिती थांबवली. त्याने त्याच्याकडे पैसे बँकेत भरून एक ट्रस्ट बनवला. त्या पैशाच्या व्याजातून दरवर्षी नोबल पुरस्कार देण्याची परंपरा निर्माण केली. त्याने त्याच्या अपयशाचा अभ्यास केला आणि त्यावर मात केली. आज ‘नोबेल पुरस्कार’ ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आता या वरील कथेकडे प्रत्येक जण कसा पाहतो ते महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याविषयी कोणी वाईट बोलत असेल, तर आपण म्हणतो की, तो स्वतःच किती वाईट आहे! आपल्यातले दोष आपल्याला कधी दिसतच नाहीत आणि कोणी दाखवले तरी ते आपल्याला आवडत नाहीत. अशा वेळेस आपल्यात सुधारणा होणार कशी? या उलट एखादा माणूस असेही विचार करेल की, कोणी कोणाविषयी का वाईट बोलेल बरे? आपल्यातील एखादा दोष, दोष वाटत नसेल तरी इतरांना त्याचा त्रास होतो, त्यांच्या दृष्टीने आपले वागणे चुकीचे आहे. आपल्याला आपल्या या दोषावर लक्ष देऊन तो दूर करायला हवा!
जो माणूस दुसऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो तो बरोबर की, जो माणूस दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे स्वनिरीक्षण करतो स्वतःमध्ये सुधारणा करतो तो बरोबर? याचा ज्याने त्याने विचार करावा! ‘अल्फ्रेड नोबेल’ हा संशोधक होता. शास्त्रज्ञ होता. त्यांनी दुसऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नाही. जनसमुदायाचे मत ग्राह्य धरले आणि त्यामुळे तो अजरामर झाला. एक छोटेसे उदाहरण देते – एका माणसाला वाटले की, आपण महान वक्ते आहोत. त्या माणसाने खूप चांगले भाषण केले, पण संपूर्ण भाषणामध्ये ‘मी’पण खच्चून भरलेले होते. त्याच्या भाषणानंतर दुसरा माणूस भाषणासाठी उभा राहिला. त्याने भाषणाची सुरुवातच एका गाण्याच्या ओळीने केली –
‘कल और भी आयेंगे
मुझसे बेहतर कहनेवाले
तुमसे बेहतर सुननेवाले!’
समोरचा जनसमुदाय बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट करत होता. त्या ‘टाळ्या’ कशासाठी होत्या हे वेगळे सांगण्याची गरज नाही! त्यामुळे अनेकांनी लक्षात घ्यायला हवे की ‘टाळ्या’ आपण चांगले बोलतोय म्हणून मिळताहेत की टाळ्या आपण भाषण थांबवावे म्हणून मिळत आहेत?