कहाणी उपाहारगृहांची शृंखला चालविणाऱ्या पॅट्रिशियाची
- दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
संकटे माणसाला सक्षम बनवतात, अशा अर्थाचं एक सुभाषित आहे. पण तिच्या आयुष्याचं मात्र दुसरं नावंच संकट असावं जणू अशा प्रकारे संकटांची मालिका सुरू झाली. सर्वसामान्य मुलीसारखं तिचं जीवन होतं. त्याच्या आयुष्यात येण्याने तिचं जगणंच बदललं. तो हिंदू ब्राह्मण आणि ती ख्रिश्चन. मात्र प्रेमाला या जातीपातीचं बंधन नसतं. त्या दोघांनी ही बंधने झुगारून लग्न केलं. तिने सुखी संसाराची स्वप्ने रंगवली. आपल्या चिमुकल्या संसाराला हसतमुखाने सुरुवात केली. हळूहळू या संसारवेलीवर दोन फुले देखील उमलली. सर्व छान सुरळीत चाललं असताना, राजा-राणीचा सुखाचा संसार चालू असताना कोणाची तरी नजर लागावी असं काहीसं घडलं. तो दारूच्या आहारी गेला. तिला शिवीगाळ करू लागला. एव्हढंच नव्हे, तर आता मारहाण देखील करू लागला. तिच्यासमोर दोनच पर्याय होते. आपल्या दोन लहान चिमुरड्यांना घेऊन आत्महत्या करावी किंवा आलेल्या परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊन लढावं. तिने दुसरा पर्याय निवडला. आपल्या बाळांच्या उदरनिर्वाहासाठी तिने खाद्यपदार्थ विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. पहिल्याच दिवशी निव्वळ ५० पैसे मिळाले. आज तिचा दिवसाचा व्यवसाय २ लाख रुपयांचा आहे. ही कथा आहे पॅट्रिशिया नारायणची.
पॅट्रिशिया मूळची तामिळनाडूच्या नागरकॉईल येथील. पॅट्रिशियाचं लग्न झाल्यानंतर काहीच दिवसाने तिच्या नवऱ्याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. तो पूर्णत: दारूच्या आहारी गेला. तिला शिवीगाळ करू लागला. तिला मारहाण देखील करायचा. हे सगळं आता सहनशक्तीच्या पलीकडे जात होतं. आंतरधर्मीय विवाह केल्याने तिचे वडील रागावले होते. त्यामुळे ती माहेरी पण जाऊ शकत नव्हती. आपल्या लहान मुलांसह आत्महत्या करण्याचा एकच पर्याय तिला दिसत होता. पण हिंमत हरायची नाही, असे तिनं मनाशी ठाम निश्चय करत नवऱ्याचं घर सोडलं. भाड्याने घर घेऊन वेगळी राहू लागली. वय होतं अवघं १८ वर्षे. तिला एक कला उत्तम यायची ती म्हणजे पाककला. घरीच पापड, लोणची, जॅम बनवून विकायला तिने सुरुवात केली. उद्योगाची सुरुवात इथे सुरू झाली.
अपंगाची संस्था चालविणाऱ्या एका सुहृदय गृहस्थाने पॅट्रिशियाला एक कुठेही सहज वाहून नेता येईल असं खोकं दिलं. त्याचबरोबर मदतनीस म्हणून २ अपंग मुले दिली. चेन्नईच्या प्रसिद्ध मरीना बीचवर तिने पथारी पसरवून विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडले. भजी, कटलेट, समोसा, ताजा फळांचा रस, चहा, कॉफी अशी खाद्यपदार्थांची रेलचेल होती. या बीचवर नेहमीच गर्दी असते. असं असून देखील पहिल्याच दिवशी पॅट्रिशियाला नफा झाला फक्त ५० पैशांचा. कोणत्यातरी माणसाने कॉफी घेतल्याने तेवढेच ती कमावू शकली. या पहिल्याच अनुभवाने पॅट्रिशिया हादरून गेली. जवळ्पास तिने परिस्थितीसमोर शरणागतीच पत्करली होती. मात्र यावेळी तिच्या आईने तिला सावरलं. आधार दिला. दुसऱ्या दिवशी मात्र ७०० रुपये तिने कमावले. तिने तिच्या मेन्यूमध्ये आईसक्रीम, फ्रेन्च फ्राईज आणि सँडविचचा समावेश केला. पॅट्रिशियाने ५० पैशांपासून ते दैनंदिनी २५ हजार रुपयेच्या मिळकतीपर्यंत झेप घेतली. हा काळ होता १९८२ ते २००३ चा. आपल्याला कुटुंबाला आधार ठरेल, इतपत ती कमावू लागली.
झोपडपट्टी निर्मूलन मंडळच्या अध्यक्षांना तिच्या पदार्थांची चव आवडली. त्यांनी तिला मंडळाचे कन्टिन चालविण्यास दिले. पॅट्रिशियासाठी ही सुवर्णसंधी होती. तिने मंडळाचे विविध शाखांमधील कॅन्टिन्स देखील चालविण्यास घेतले. १९९८ साली ती संगीता रेस्टॉरन्ट समूहाची भागीदार झाली. बँक ऑफ मदुराई, नॅशनल पोर्ट मॅजमेंट ट्रेनिंग स्कूल येथे स्वत:चं कॅन्टिन सुरू केलं. आता ती आठवड्याला लाख रुपये कमावू लागली. अशा एका टप्प्यावर ती पोहोचली जिथे ती स्वत:चं हॉटेल आणि स्वत:चा ब्रॅण्ड सुरू करू शकेल. पण परत एकदा कोणाची तरी नजर लागली. नुकतंच लग्न झालेल्या तिच्या मुलीला आणि जावयाला अपघाती मृत्यूने हिरावून नेलं. परत एकदा पॅट्रिशिया उद्ध्वस्त झाली. मात्र तिचा मुलगा, प्रवीण कुमारने आपले मर्चंट नेव्हीमधील करिअर सोडून व्यवसायाला सावरलं. तब्बल २ वर्षाने पॅट्रिशिया या धक्क्यातून बाहेर आली. जिथे आपल्या मुलीचा आणि जावयाचा अपघाती मृत्यू झाला, ज्या ठिकाणी त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध झाली नाही. त्या ठिकाणी पॅट्रिशियाने विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आज त्या परिसरात कोणत्याही अपघातस्थळी ही रुग्णवाहिका तातडीने पोहोचून जखमींचे प्राण वाचविते.
आज मोठ्या जोमाने पॅट्रिशिया आपल्या मुलासह ‘संदीपा’ या नावाने उपाहारगृहांची शृंखला चालविते. संदीपा हे तिच्या मरण पावलेल्या मुलीचं नाव. तिच्या स्मरणार्थ तिने हे नाव दिलं. पहिल्याच दिवशी ५० पैसे कमाविणाऱ्या या रणरागिनीची दिवसाची कमाई तब्बल २ लाख रुपये इतकी आहे. २ कामगारांनिशी केलेली सुरुवात आज २०० कामगारांपर्यंत पोहोचलेली आहे. फिक्की या उद्योजकीय संघटनेने ‘सर्वोत्तम उद्योजिका’ म्हणून तिला गौरविले आहे. ‘जेवढी संकटे येतील त्यांना आव्हान म्हणून स्विकारा. त्यांना धैर्याने तोंड द्या. हार मानू नका. नवीन, जगावेगळं काहीतरी करा. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करा.’ असं सागणारी पॅट्रिशिया खऱ्या अर्थाने कणखर ‘लेडी बॉस’ आहे.