पुणे : वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. अनेकदा पुणेकर ‘नो पार्कींग’ मध्ये गाडी पार्क करतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. यासाठीच पुण्यात वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यातच आता पुण्यात ‘नो पार्कींग’ मध्ये गाडी लावणा-यांसाठी पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आली आहे.
यानुसार पुणे शहरातील वाहनचालकांना पार्किंगच्या उल्लंघनासाठी दंडास सामोरे जावे लागेल. गुन्ह्यानुसार ७८५ रुपये ते २,०७१ रुपये इतका घसघशीत दंड आकारला जाईल. नो-पार्किंग भागात पार्किंग केल्यास पहिल्या वेळेस ७८५ रुपये आणि दुसऱ्या वेळेस १,७११ रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर पुन्हा उल्लंघन केल्यास अनुक्रमे १७८५ रुपये आणि २०७१ रुपये दंड आकारला जाईल.
पेमेंट प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी दंडासाठी पैसे म्हणून रोख रक्कम स्वीकारणार नाहीत. पेमेंटसाठी QR कोड पर्याय, तसेच UPI पेमेंट, ई-चलन मशीनदेखील उपलब्ध नसतील. त्यामुळे, दंड केवळ डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून भरला जाऊ शकतो.
दुचाकी तसेच चारचाकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी दंड सारखाच राहील. हे नियम प्रतिबंधित झोनमध्ये सतत वाहने पार्क करणाऱ्या व्यक्तींवर दबाव निर्माण करण्यासाठी तयार केलेले आहेत.