अहमदनगर : अहमदनगर दौ-यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर कोण संजय राऊत असा प्रतिप्रश्न करत त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलणे त्यांनी टाळले.
संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे नेते आहेत, अशी टीका करत फडणवीस यांच्या लेखी राऊतांना काडीचीही किंमत नसल्याचे दिसून आले.
महाविकास आघाडीमध्ये काही झाले तरी त्याचा आरोप भाजपवर होत असतो. भाजप सर्व काही करत असल्याचे बोलले जात असताना पुढील काळात मुलगा झाला तर आमचं नाव घेऊ नका, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. त्यात शिंदे गट २२ जागांवर दावा करेल, असे खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे. याबाबत विचारणा केली असता, आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. आम्ही खूप समन्वय ठेऊन काम करतो. शिवसेना-भाजपा युतीत समन्वयाने काम होईल. आमच्या सर्व गोष्टी निश्चित होतील तेव्हा माध्यमांना याची माहिती देऊ, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.