Monday, June 30, 2025

अलिबागला पोहोचायला लागणार चार तास!

अलिबागला पोहोचायला लागणार चार तास!

मुंबई : पावसाळा, उन्हाळा अगदी कोणत्याही ऋतूत पर्यटक अलिबागला जाणं नेहमीच पसंत करतात. समुद्रमार्गे बोटीने येताना प्रवाशांना लाटांचा आनंद घेत प्रवास करता येतो. पर्यटक जलवाहतूकीद्वारेच अलिबाग गाठत असतात. त्यामुळे सर्वच प्रवाशांना जलवाहतूक फायदेशीर ठरत असते. सोबतच एका तासात पोहोचता येत असल्यामुळे वेळेचीही बचत होते. मात्र आता याच प्रवासासाठी चार तास मोजावे लागणार आहेत.


याचं कारण म्हणजे पावसाळा तोंडावर आला असताना वेळेची बचत करणारा मांडवा ते गेट वे हा जलवाहतूक प्रवास आता तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद राहणार असून, महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने जलवाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना पत्र देऊन वाहतूक बंद करण्याचे कळविले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्या-येण्यासाठी आता रस्ते मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. जलवाहतूकीद्वारे मुंबई गाठण्यासाठी एका तासात होणा-या प्रवासाला रस्तेमार्गामुळे चार तासाचा अवधी लागणार आहे.


मांडवा ते गेटवे समुद्री ब्लॉक असला तरी मांडवा ते भाऊचा धक्का रो रो बोट सेवा सुरू राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असली तरी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, हवामानानुसार रो रोच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता तीन महिने रस्ते मार्गानेच ये-जा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment