आमदार नितेश राणे यांची सडकून टीका
पुणे : उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पक्ष, संघटना राहिलेली नाही. त्यांचे उर्वरित आमदार युतीकडे येतील आणि केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे शिल्लक राहतील. त्यामुळे ते पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी नसलेल्या संघटनेचे पक्ष प्रमुख आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे ओसाड गावचे पाटील आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
उद्धव ठाकरे हे न्यायालयाच्या निकालानंतर तोंडावर आपटले आहेत. त्यामुळे पक्ष प्रमुख म्हणून ते अधिकृत आहेत का, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. मात्र, त्यानंतर ही ते स्वतःला पक्ष प्रमुख म्हणून मिरवत आहेत. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात राज्यसभा मध्ये तक्रार दाखल झाली असून लवकरच त्यांची खासदारकी रद्द होईल, असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
राऊत यांना लवकरच जेल मध्ये जावे लागणार आहे. त्याच्यासाठी कारागृहात बराक तयार होत आहे. जेलमध्ये जाण्याची वेळ आल्याने त्याचा चेहरा काळवंडलेला दिसून येत आहे. कर्नाटक मध्ये राऊत प्रचारासाठी गेला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला पणवती लागली. त्यामुळे भाजपवर आरोप करताना आधी स्वतःची लायकी पहावी. मुंबई मनपात मागील २५ वर्ष मोठा भ्रष्टाचार झालेला असून उद्धव ठाकरे ज्या गाडीत फिरतात ती सुद्धा मराठवाड्यामधील एका आमदाराची आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्वतःचा भ्रष्टाचार पहिला पाहावा. मातोश्री दोन मध्ये एक कामगार पडून गंभीर जखमी झाल्याने त्यास गुरुदत्त हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी करावी कारण मातोश्री मधील लोकांना ढकलून देण्याची सवय आहे, असा आरोपही आमदार राणे यांनी केला आहे.
तसेच खासदार संजय राऊत यांनी त्यांची सुरक्षा सोडून त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दाखवावे. परत येताना ते दोन पायावर येणार नाही. सदर मंदिरात जिहादी लोकांनी शिरण्याचा प्रयत्न केला आहे. आता कोण स्वतःला शिवभक्त म्हणत असेल तर त्यांनी मंदिरात चादर टाकण्यासाठी गेलो होतो हे निर्भयपणे सांगून दाखवावे. यांना वेळीच अडवले नाही तर उद्या हे लोक मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिरात शिरतील. सर्वधर्मसमभाव शिकवण दरवेळी केवळ हिंदूंनी का स्वीकारावी, असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.