छपरा: बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रसुलपूर टिकुलिया टोला डुमरी येथील विद्यालयात मध्यान्ह भोजनात पाल सापडली असून हे जेवल्यानंतर ३५ मुलं आजारी पडली आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं मध्यान्ह भोजन जेवत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात मेलेली पाल आढळली. विद्यार्थ्याने याची माहिती शिक्षकांना देताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मध्यान्ह भोजनाचे वाटप बंद करण्यात आले. काही वेळाने मुलांची प्रकृती ढासळू लागली आणि ५० मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला.
यापैकी ३५ मुलांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पूनम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनूसार, या मुलांना एका स्वयंसेवी संस्थेद्वारे अन्न वाटप केले जाते. या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न वाटप थांबवण्यात आले आहे.
या घटनेनंतर जिल्ह्याची शासकीय यंत्रणा अलर्टवर असून सर्व मुलांवर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम तयार असल्याचे एसडीओ संजय कुमार यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.