मुंबई: मी वडिलांबरोबर ठिकठिकाणी फिरलो आणि त्यांना आपली मदतच होईल असं वाटल्यामुळे त्यांच्याबरोबर राजकारणात आलो. भावालाही त्यादृष्टीने सोबत घेतले, असे भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी एबीपी नेटवर्कचे समुह संपादक राजीव खांडेकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाहत पाहत लहानाचा मोठा झालो. त्याच्यामुळे आजही माझ्यातला शिवसैनिक गेलेला नाही. त्या तुलनेत नितेश बऱ्यापैकी भाजपात रुळला आहे असेही ते म्हणाले. आम्हाला आमचा व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र अनेकदा आमच्या वडिलांनी आम्हाला वेळोवेळी योग्य ते सल्ले दिले आणि ते व्यवसाय आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने केले, असेही निलेश राणे म्हणाले.