भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली भावना
मुंबई: एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाकट्टा या मुलाखत कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी राजकारण तसेच वैयक्तिक आयुष्यातील त्यांचे अनुभव सांगितले.
नितेश राणे म्हणाले, २००६ पर्यंत मी लंडनमध्येच होतो. त्यावेळी मी आईला सांगितलं मला इथेच राहायचं आहे, यासाठी काही करता येईल का? पण मला व्हिसा मिळाला नाही. मग मला परत यावं लागलं. मला परत यायची ओढ नव्हती. पण वडिलांची इच्छा होती शिक्षणानंतर मी परत यावं आणि इथे काम करावं. त्यानंतर मी २००६-०७ च्या दरम्यान भारतात परत आलो, तेव्हा साहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २००९ला साहेबांनी विचारलं निवडणूक लढतोस का, पण मी वेळ घेतला.
यावेळी राणे यांना भाजपातील सक्रीय सहभागाबद्दल विचारलं असता नितेश राणे म्हणाले, भाजपात आम्ही रुळलोय. कारण आम्ही १२ वर्ष काँग्रेसमध्ये असलो तरी काँग्रेसने आम्हाला कधीच स्वीकारलं नाही. तिथे कायम आम्हाला राणे समर्थक मानलं जायचं. किंवा राणे हे वेगळेच आहेत असं म्हटलं जायचं, तसंच वेगळं ठेवलं होतं. परंतु भाजपाने आम्हाला परिवार म्हणून स्वीकारलं आहे. जवळ घेतलं आहे. त्यामुळे भाजपात काम करायला मजा येते.