नारायण राणे यांनी सांगितला पहिल्या नगरसेवक निवडणूकीचा किस्सा
मुंबई: एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या संघर्षकाळातील अनेक किस्से सांगितले. त्यातील एक म्हणजे ते पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हा त्यांनी त्यांचे राजकीय कौशल्य कसे वापरले याबाबतचा किस्सा आहे.
नारायण राणे म्हणाले, मी ज्या सुभाष नगर परिसरातून नगरसेवक झालो तेथे फक्त १८ टक्के मराठी लोक होते. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन डॉ. मुजुमदार यांच्या विरोधात निवडणूक लढलो. त्यावेळेला मी राणे पॅटर्न तयार केला. वैचारिक प्रचार करून तेथे जिंकणं अशक्य होतं. हण्या परब नावाचा माझा मित्र होता. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री त्याला बोलावले. वेगवेगळ्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांची एक लिस्ट त्याच्याकडे दिली आणि त्या सर्वांना बोलावून घेतले. वेगवेगळ्या पक्षाचे ते लोक होते. त्यांना फक्त दोन वाक्यं सांगितली. उद्या याच रस्त्यावरून तुम्हाला नोकरी, धंद्याला जायचंय…. माझा ऐकले तर चांगले आहे आणि त्यांनी माझं ऐकलं… त्या सगळ्यांना एक एक रिक्षा दिली. ४८ रिक्षांमध्ये ४८ माणसं फिरत होती. आपापल्या भागामध्ये ते गेले आणि फक्त एवढेच सांगितलं की, धनुष्यबाण.. नारायण राणे… धनुष्यबाण… नारायण राणे… त्यांना एक तास फिरवले आणि सोडून दिलं.
आदल्या दिवसापर्यंत आपापल्या पक्षासाठी प्रचार करणारे हे नेते ऐनवेळी माझा प्रचार कसा करतात म्हणून लोकही हैराण झाले. त्यातच मतदारसंघातला क भाग असा होता की तेथे मराठवाड्यातले दुष्काळग्रस्त आणून ठेवले होते. त्यांना काय हवं नको ते बघितले. त्यांची एकगठ्ठा मते मिळाली. त्या निवडणुकीत ७५० मतांनी मी विजयी झालो. दांडगाई न करता फक्त कौशल्य वापरून आपण ही निवडणूक जिंकली, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.