Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीकर्नाटक निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसाचा दरीत पडून मृत्यू

कर्नाटक निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसाचा दरीत पडून मृत्यू

लघुशंकेसाठी आंबोली घाटात उतरताना तुटलेल्या कठड्यावरुन घसरुन खोल दरीत कोसळले

सिंधुदूर्ग : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात मितीलेश पॅकरा या छत्तीसगड पोलिसाचा आंबोली घाटात कोसळून मृत्यू झाला आहे. प्रवासादरम्यान लघुशंकेसाठी आंबोली घाटात उतरताना तुटलेल्या कठड्यावरुन घसरुन ३०० फूट खोल दरीत पडल्याने हा मृत्यू झाला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलीस छत्तीसगडवरुन कर्नाटक रायबाग या ठिकाणी आले होते. त्यांपैकी मितीलेश पॅकरा एक होते. ड्युटीवरुन काही दिवस सुट्टी मिळाल्याने पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. तेथून परतताना ही दुर्घटना घडली.

वाटेत पोलिस लघुशंकेसाठी आंबोली घाटातील धबधब्याजवळ उतरले. त्यातील मितीलेश पॅकरा दरीच्या दिशेने गेले. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून ते जवळपास ३०० फूट खोल दरीत कोसळले.

त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ आंबोली पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच आंबोली पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी मितीलेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. बचाव पथक पोहोचले तेव्हा मितीलेश शुद्धीत होते. मात्र, काही वेळातच त्यांनी प्राण सोडले. त्यानंतर आंबोली घाटातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मितीलेशच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तसेच मितीलेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. आज शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -