पुणेः राज्यात परवापासून सर्वत्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आज पुण्यात अवकाळी पाऊस सुरु होता. पुण्यातल्या वडगाव धायरी, घोरपडी परिसरात, रामटेकडी तसेच वैदूवाडी येथे विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे. तळजई भागात गारपीट झाली असून वडगाव धायरीमध्ये तसेच घोरपडी परिसरात जोरदार पाऊसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झालीय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, गारा आणि वादळी वाऱ्यासह आज अवकाळी पाऊस होऊ शकतो. यामध्ये सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.