Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणदोनशे कोटी रुपयांचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू होणार : केंद्रीय मंत्री...

दोनशे कोटी रुपयांचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू होणार : केंद्रीय मंत्री नारायण राणे

  • कोकणातील पहिल्या शासनमान्य कोकण भूमी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे उद्घाटन
  • पाचशे एकर क्षेत्रात मोठी इंडस्ट्रीज आणणार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी ज्या ज्या शिक्षणाची अपेक्षा आहे, ते प्रत्येक प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाईल. त्यासाठी दोनशे कोटी रुपये खर्चाचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू केले जाणार आहे. चांगले प्रशिक्षण घेऊन उच्च प्रतीच्या नोकऱ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मिळविण्याची क्षमता येथील तरुण-तरुणींमध्ये निर्माण होईल, अशा पद्धतीचे प्रयत्न माझे सुरू आहेत. लवकरच पाचशे एकर क्षेत्रात मोठी इंडस्ट्रीज जिल्ह्यात येईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.

कोकणातील पहिले शासनमान्य कोकण भूमी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी एसएसपीएम संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलम ताई राणे, सचिव नितेश राणे, सदस्य श्रीमती प्रगती नरे, कोकण भूमी टेक्नॉलॉजी इनक्युबेशन सेंटरचे संचालक अभिषेक तेंडुलकर व सौ. आसावरी राजोपाध्ये, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, विकासाच्या बाबतीत मी नेहमीच आग्रही राहिलो आहे. म्हणूनच कणकवलीत दोनवेळा माझ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योग प्रशिक्षण आणि प्रदर्शन कार्यक्रम घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३५० तरुण-तरुणींनी उद्योजक होण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. सकारात्मक दृष्टीने काम केल्यास असे यश आणखी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राणेंचे कंपाऊंड ओलांडता येणार नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत धरण, रस्ते, पाणी व अन्य विविध विकास कामे आपणच आणलीआहेत. विरोधकांनी फक्त ठेके घेतले आणि निकृष्ट कामे केली, अशी टीका करताना आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्गात आले की, उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत असल्याचे भासवतात. मात्र मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच केबिनमध्ये बसलेले असतात. त्यांना शिवसेनेत जायचे आहे, त्यासाठी ते एकनाथ शिंदे यांना विनंती करतात. मात्र त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये राणेंचे कंपाऊंड आहे. ते कंपाउंड ओलांडता येणार नाही.

आमदार नितेश राणे यांच्या कामाचे राणे यांनी केले कौतुक

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन इनक्युबेशन सेंटर सुरू केले. त्याचप्रमाणे मुलींसाठी मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. याबद्दल विचारले असता, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले, आमदार नितेश राणे यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील काम खूपच चांगले आहे. त्या कामाची नोंद जनतासुद्धा वेळोवेळी घेते, त्यांना प्रतिसाद देते, त्यांचे अभिनंदन करते. असे चांगल्याची नोंद घेणारी जनता असेल, तेव्हा आणखीन चांगले काम करणारे निपजतील. चांगल्या कामाचे कौतुक झाले तर रावण निपजणार नाहीत. मात्र समाजसेवक नक्कीच घडत जातील, असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -