हिसार: नील गाय अचानक आडवी आल्याने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या गाडीला रविवारी सकाळी किरकोळ अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांना कुठलीही इजा पोहोचली नाही. मात्र, त्यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यावेळी, माजी मंत्री जयप्रकाश, वीरेंद्र सिंह, धर्मवीर गोयत, नरेश सेलवाल हेही त्यांच्यासमवेत कारमध्ये होते. अपघातात सर्वचजण सुखरुप आहेत.
याप्रकरणी स्वत: भूपेंद्रसिंह हुडा यांनी ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मी व माझा संपूर्ण स्टाफ सुरक्षित असून नियोजित कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भूपेंद्रसिंह गाडीतून जात असताना पुढील सीटवर बसले होते. गाडीला अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या गाडीने घिरायें गावातील नियोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.
हिसारचे पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अचानक एक नील गाय रस्त्यावर आडवी आली. त्यावेळी, चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवले, पण धडक बसल्याने अपघात झाला.