- ऐकलंत का!: दीपक परब
असं फारच क्वचित होतं की, एखादं पुस्तक लिहून पूर्ण होण्यापूर्वी ‘ओटीटी’साठी त्यावर वेबसीरिजची घोषणा होते. ‘एक थी शीना बोरा’ या पुस्तकाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे. मुंबईत आयोजित ‘किताब मेला’ या कार्यक्रमात पुस्तकाचे लेखक संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली. शीना बोरा हत्याकांडाने २०१५ साली देशभर खळबळ उडवली. संपूर्ण देश या हत्येच्या जटिल जंजाळात अडकलेला आहे, असंच वाटत होतं. पोलिसांच्या मते इंद्रायणी मुखर्जीने आपला पहिला पती सिद्धार्थ दासपासून झालेली मुलगी शीना बोरा हिचा खून आपला दुसरा नवरा संजीव खन्ना आणि चालकाच्या मदतीने केला. इंद्रायणीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी याचा मुलगा राहुलसोबत शीनाचं प्रेम प्रकरण सुरू होतं. राहुल पीटरच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा होता. त्यामुळे या दोघांचे लग्न होऊ नये, असे इंद्रायणीला वाटत होते. इंद्रायणीचा दुसरा नवरा संजीव खन्नापासून झालेल्या मुलीला तिसरा नवरा पीटरने दत्तक घेतले होते. लेखक संजय सिंह यांच्या मते, ‘या प्रकरणात आजी-आजोबांना आपल्या नातवांचे आई-वडील बनून राहायला लागलं. सख्ख्या आईला आपल्या मुलीची मोठी बहीण असल्याचं भासवायला लागलं आणि एका आयपीएस ऑफिसर्सच्या यशस्वी कारकिर्दीला डाग लागला. या हायप्रोफाइल प्रकरणात सर्व काही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातेसंबंधांचा जंजाळ व त्याने तयार झालेलं जबरदस्त कन्फ्युजन. मी या प्रकरणावर काम केलं होतं. त्यामुळे या क्लिष्ट गोष्टीला साध्या सोप्या पद्धती सांगत, घटनांना एका रांगेत ठेवून त्या समजून सांगणं गरजेचं आहे’. राजकमल पब्लिशिंग हाऊसला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत नेहरू सेंटर येथे किताब मेला आयोजित करण्यात आला. त्यात लेखक आणि कवी गुलजार, जावेद अख्तर, पीयूश मिश्रा आणि सौरभ शुक्लासारख्या हिंदीतल्या दिग्गजांनी हजेरी लावली. संजय सिंह यांनी सांगितले की, हे पुस्तक पूर्ण होण्यापूर्वीच एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने त्यावर वेबसीरिज बनवण्याचे हक्क विकत घेतले आहेत.
संजय सिंह हे मुंबईतले ज्येष्ठ शोध पत्रकार आहेत. अब्जावधी रुपयांचा तेलगी स्टॅम्प घोटाळा उघड करण्याचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. पहिले पुस्तक ‘तेलगी स्कॅम एक रिपोर्टर की डायरी’वर अप्लॉज मीडिया ही अग्रगण्य प्रॉडक्शन कंपनी ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज बनवत आहे. येत्या काही महिन्यांत सोनी लाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचे प्रदर्शन होणार आहे. शिवाय संजय सिंह यांनी पत्रकार राकेश त्रिवेदींसोबत लिहिलेल्या ‘CIU: क्रिमिनल इन युनिफॉर्म’ या पुस्तकावरही वेबसीरिजची घोषणा नुकतीच करण्यात आलीय.