- कथा: प्रा. देवबा पाटील
लव्हाळा नावाचे एक गाव एका छानशा डोंगराच्या शेजारी वसलेले होते. डोंगरावर एक खूप मोठा व भव्य असा ऐतिहासिक राजेशाही किल्ला होता. त्या गावात राघव नावाचा १५ वर्षांचा एक अत्यंत धाडसी मुलगा राहत होता. तो किल्ला बघण्यासाठी गावातील राघव व त्याच्या भानू, नामू, गणू, मोनू, सोमू व सोनू या ७ मित्रांनी सहल काढण्याचे ठरविले.
एका ठरलेल्या दिवशी सकाळीच मुले आपापले डबे घेऊन सहलीला जाण्यासाठी आपापल्या सायकलवर स्वार झाली. त्यांनी डोंगराच्या पायथ्याशीच असलेल्या एका छोट्या खेड्यात आपल्या सायकली ठेवल्या व किल्ला बघण्यासाठी डोंगर चढणे सुरू केले. ते किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. तेथे त्यांना एक माणूस भेटला. तो त्यांना सारी माहिती सविस्तरपणे रंगवून सांगू लागला. सारे किल्ला पाहण्यात व तो सांगत असलेल्या माहितीत इतके तल्लीन होऊन गेलेत की संध्याकाळ झाल्याचे त्यांना भानच राहिले नाही. चोहिकडे सामसूम झाल्याचे पाहताच त्या माणसाने आपल्या खिशातील पिस्तूल काढले व या मुलांवर रोखले. ‘खबरदार पोरांनो! ओरडाल तर एकेकाला गोळी घालून ठारच करीन,’ असे त्याने मुलांना दरडावले. एवढ्यात क्षणातच तेथे कोठून तरी त्याचे पाच-सहा साथीदारही टपकले. त्या प्रत्येकाचे हातात काही ना काही शस्त्रास्त्रे होती. त्या गुंडांनी प्रत्येक मुलाचे हात-पाय व मुसक्या बांधल्या, चेहऱ्यावर काही तरी सुगंधित रुमाल टाकले. मुलं बेशुद्ध झाली. मुलांना जेव्हा शुद्ध आली, तेव्हा ते एका अंधार कोठडीत पडलेले असल्याचे त्यांना जाणवले.
राघवच्या हातापायांची दोरी सुटलेली असल्याचे त्याला जाणवले. त्याने युक्ती-प्रयुक्तीने हळुवारपणे स्वत:ला त्या दोऱ्यांच्या बंधनातून सोडविले व आपल्या बाजूच्या मित्राच्या कानात ही गोष्ट सांगितली. हळूहळू त्याने आपल्या हातांनी व दातांच्या मदतीने युक्ती-प्रयुक्तीने बाजूच्या मित्राच्याही बांधलेल्या दोऱ्या सोडल्या. त्या अंधार कोठडीला खूप उंचावर एकच चांगला मोठा व रुंदसा चौकानी झरोका होता. त्या झरोक्यातून चंद्राचा पांढराशुभ्र स्वच्छ प्रकाश त्या अंधाऱ्या खोलीत येत होता. राघव विचार करू लागला. एवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. राघवने त्यांना आपला सर्वांचा मनोरा कसा रचायचा याची कल्पना दिली. राघवने सांगितल्यानुसार थोडाही आवाज न करता ते मनोऱ्यासाठी भिडले आणि त्यांचा मनोरा पूर्ण झाला. राघव सोमू-सोनूच्या खांद्यावरून झरोक्यापर्यंत पोहोचला. राघवने प्रथम आपला एक हात बाहेर काढून त्या हाताने फांदी पकडली. नंतर आपले डोके व दुसरा हात बाहेर काढीत तो झरोक्यातून बाहेर येत त्या फांदीवर जाण्यात यशस्वी झाला. त्याने त्या उंच झाडावरून प्रथम आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले. त्याला खूप दूरवर रस्त्यावरील खांबांवर अंधुकसे विद्युत दिवे दिसले.
राघव हळूहळू झाडावरून खाली उतरला. पावलांचा जराही आवाज न करता तो चोहिकडे काळजीपूर्वक बघत अतिशय सावधतेने दिव्यांच्या दिशेने जाऊ लागला. इतक्यात त्याला रस्त्यावर दुरून एक ट्रक येताना दिसला. राघवने आपल्या शरीरातील सारे बळ एकवटून रस्त्यावर उडी घेतली. कपडे खराब झालेला शाळकरी मुलगा असा एकदम अचानक रस्त्यावर आडवा आलेला पाहून ट्रकचालकाने ट्रक थांबवून तो खाली उतरला. राघवने त्याला थोडक्यात हिंदीमध्ये आपबिती सांगताच त्याने प्रथम राघवला आपल्या ट्रकमध्ये घेतले, प्यायला पाणी दिले व आपला ट्रक सुरू केला. त्याने वेगाने ट्रक दामटला व जवळच्याच पोलीस ठाण्यामध्ये नेला.
ट्रकचालकाने राघवला ताबडतोब तेथील ठाणेदाराजवळ नेले. राघवने सगळ्या परिस्थितीची त्यांना कल्पना देताच त्यांनी त्वरित पोलीस अधीक्षकांना फोनवरून ह्या घटनेची माहिती दिली व राघवला सोबत घेऊन सशस्त्र पोलिसांसह पोलीस व्हॅन्स जंगलाच्या कोठडीकडे धावू लागल्या. अतिरेकी गुंडांना काही कळण्याआधीच सात-आठ इन्स्पेक्टर्स काही पोलिसांसह चारही बाजूंनी कोठडीकडे धावले. समोरच्या दरवाजाकडील तीन-चार इन्स्पेक्टरांनी धाडकन जोराने दरवाजाला लाथ मारताच तो जुना जीर्ण दरवाजाच मोडून पडला. गुंड सावरण्याआधीच हे सारे इन्स्पेक्टर्स तातडीने त्यांच्याकडे झेपावले व त्यांच्या मानगुटीवर बसले. सोबतच्या पोलिसांनी त्यांना ताबडतोब बेड्या ठोकल्या.
एका इन्स्पेक्टरने त्या गुंडांजवळून त्या खोलीच्या कुलपाची चावी हिसकून घेतली व कुलूप उघडून दरवाजा उघडला. राघवला व पोलिसांना बघून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. साऱ्या मुलांना एका पोलीस व्हॅनमध्ये बसवून ती व्हॅन सशस्त्र पोलीस संरक्षणासह लव्हाळा गावाकडे निघाली. किल्ला बघायला सहलीला गेलेली मुले संध्याकाळी परत न आल्याने लव्हाळा गावात सगळे चिंताग्रस्त झाले होते. साऱ्या गावकऱ्यांनी रात्रभर सगळीकडे मुलांचा कसून शोध घेतला, पण मुलांचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी तालुक्याच्या गावी निघणार एवढ्यात मोटरसायकलने दोन पोलीसच गावात आले. त्यांनी राघवने पोलीस स्टेशनला सांगितलेल्या सर्व घटना गावकऱ्यांना सांगितल्या. थोड्याच वेळात पोलीस व्हॅन गावात आली. मुले सावरल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टरने राघवच्या धाडसाची कथा गावकऱ्यांना सांगितली. सगळ्यांना आनंद झाला.