- ऐकलंत का!: दीपक परब
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे अजरामर महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक अर्थात टीझरचा प्रकाशन समारंभ शाहिरांच्या आठव्या स्मृतिदिनी नुकताच वांद्रे येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे झाला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या टीझरचे प्रकाशन करण्यात आले. शाहिरांची ही जीवनगाथा म्हणजे रसिकांसाठी गाण्यांच्या रूपातील एक पर्वणी असणार असल्याची खात्री हा टीझर पटवून देतो. यावेळी शाहिरांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल तसेच पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेला हा चित्रपट एक भव्य आणि केवळ पडद्यावर पाहावा असाच चित्रपट आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या लौकिकाला साजेसा असा हा मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. शाहिरांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘कोणताही स्वातंत्र्यलढा, कोणतीही सामाजिक चळवळ ही मनामनात, घराघरात पोहोचविण्याचे काम हे कलाकार करत असतात. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १९६० साली आला, त्यात अनेक लोकांचे योगदान होते. पण त्या काळात शाहिरांनी दिलेले योगदान खूप मोठे होते. अशा लोकांमुळे स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्र सारखी चळवळ असो, त्या जवळ येत जातात. हे लोक मनामनात आणि घरघरात पोहोचलेले असतात. कोणतीही चळवळ सांघिक स्वरूपात नेण्यात अशा लोकांचा फार मोठा वाटा असतो. हे जगभरातील अनुभव आहे. शाहिरांचे हे सर्वात मोठे योगदान आहे. शाहिरांनी मी लहानपणापासून पाहत आलो आहे. ते आमच्या घरी माननीय बाळासाहेबांना भेटायला यायचे. मला ते ‘जय जय महाराष्ट्र माझा…’वाले शाहीर म्हणून माहीत होते. पण शाहिरांबद्दल एक गोष्ट सांगतो, की जे ठरावीक लोक बाळासाहेबांना ‘बाळ’ म्हणायचे त्यात एक शाहीर होते. आज बायोपिक बरेच येतात. त्यासाठी तो माणूसही तसा असावा लागतो. पण शाहिरांच्या या जीवनपटात एकेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे येत जातात.’