Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेआणि मनोरुग्ण गगम्माला मिळाले हरवलेले कुटुंब!

आणि मनोरुग्ण गगम्माला मिळाले हरवलेले कुटुंब!

तब्बल पाच वर्षे मुलाबाळांपासून झाली होती ताटातूट

ठाणे : काहींचे आयुष्य खूप संघर्षमय असते. आयुष्यातला हा संघर्ष अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करतो, तर काहींना उद्ध्वस्त झालेले जीवन पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे जगण्याची संधी मिळते. सुदैवाने गगम्मा नावाच्या महिलेला ही संधी मिळाली. पाच वर्षांपूर्वी ती मेंगलोरहुन बेपत्ता झाली होती. तेव्हापासून तिची मुले तिचा शोध घेत होते. पण ती कुठेही आढळून येत नव्हती. कदाचित ती या जगात नसावी असाही त्यांचा समज झाला होता. पण एक देवदूत गगम्माला ठाणे रेल्वे स्थानकात भेटला आणि गगम्माला हरवलेले कुटुंब मिळाले.

गगम्मा उर्फ चंपा ही ५८ वर्षीय महिला पाच वर्षांपूर्वी मेंगलोरमधील तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. तत्पूर्वी ती मुंबईतील मशिदबंदर या ठिकाणी पतीसोबत राहत होती. ते दोघेही भाजीपाला विकून उदरनिर्वाह करायचे. या व्यवसायात दोघांनीही कष्ट करून बक्कळ पैसा कमावला होता. त्यामुळे त्यांचे दिवस मोठ्या आनंदात जात होते. पण त्यांच्या या आनंदाला कोणाचीतरी दृष्ट लागली. तिच्या पतीचे निधन झाले. दोन मुली आणि एका मुलाच्या डोक्यावरचे वडील नावाचे छप्पर हरवले. पण तरीही न डगमगता गगम्माने तिचे काम सुरूच ठेवले.

व्यवसायाची लाईन मिळाल्याने तिला रोजचा चांगला नफा होत असे. अशातच तिची आई मंगलोरहुन तिच्याकडे आली. ती तिला गावी घेऊन गेली. तेथे गेल्यावर मात्र ती आणखी मोठ्या संकटात सापडली. तिचे दागदागिने, जमा असलेले पैसे आईने काढून घेतले. गगम्माने कष्टाच्या पैशातून विकत घेतलेले घर सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतले. आईकडून होणारा छळ तिला सहन होईनासा झाला. त्यातच तिला वेडाचा आजार जडला.

एकेदिवशी मनोरुग्णाच्या अवस्थेत ती रेल्वेत बसून थेट मुंबईत आली. घरातून बेपत्ता होऊन तिला पाच वर्षे झाले. तिकडे मोठ्या झालेल्या तिच्या मुली आणि मुलगा तिचा शोध घेत होते. पोलिसांकडे मिसिंग दाखल केली. पण ती कुठेच आढळून आली नाही. त्यामुळे कदाचित आपली आई या जगात नाही असाच त्यांचा समज झाला. वेड्याच्या भरात ती कुठेही फिरत असे. अशातच एका पोलिसाला ती ठाणे स्थानकावर फिरताना दिसली. त्यांनी तिला ठाणे महानगरपालिकेच्या आपुलकी निवारा केंद्रात आणून सोडले.

तेव्हापासून म्हणजेच जून २०१८ ते जानेवारी २०२३ पर्यंत गगम्मा या केंद्रात राहिली. केंद्रातील कार्यकर्त्यांनी तिची काळजी घेतली. तिचे जेवण, आंघोळ, औषध, स्वच्छता अशी सर्व कामे करून तिचा सांभाळा केला. तिला औषध वेळेवर दिले नाही तर ती रात्रभर झोपत नसे आणि इतरांनाही झोपू देत नसे. कोरोनाच्या काळात तिची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करण्यात आली. ती खूप हायपर होत असे. सर्वांना शिविगाळ करत असे. अंघोळ न करणे, अस्वछ रहाणे, जेवण व्यवस्थित न जेवणे, कुठेही घाण करणे अशा बऱ्याच कारणामुळे केंद्रातील व्यवस्थापक संदिप सरदार आणि काळजीवाहक आरती बरनवाल हे तिची काळजी घेत.

तिच्यावर ठाणे मनोरुग्ण रूग्णालयात उपचार सुरू केला. तेथील औषधांमुळे तिच्यात वागण्यात, वावरण्यात, स्वभावात बराचसा फरक पडला. एके दिवशी नेहमी प्रमाणे तिची विचारपूस केली जात असता तिने तिचा मशिदबंदर (मुंबई) येथील पत्ता सांगितला व आपल्या मुलाचे, मुलींचे, जाऊबाईची नावे सांगितली. त्याच दिवशी केंद्र व्यवस्थापक सरदार आणि काळजीवाहक बरनवाल यांनी मशिदबंदर येथील पत्ता शोधला. तेथे भेट दिली असता त्या पत्त्यावर त्यांना गगम्माचे नातेवाईक आढळून आले.

नातेवाईकांनी गगम्माला ओळखले आणि मेंगलोर येथे असलेल्या तिच्या मुला, मुलींना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ ठाणे येथील पालिकेचे आपुलकी बेघर निवारा केंद्र गाठले आणि प्रजासत्ताक दिनी आई गगम्माला सोबत घेऊन गेले. समाजविकास उप आयुक्त वर्षा दिक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत गगम्माला तिच्या कूटुंबाला सुपूर्द करण्यात आले. पाच वर्षे मुला, मुलींपासून दूर गेलेली आई आणि आई पासून दूर झालेली मुले आईला परत मिळाली. आपुलकी निवारा केंद्राचे प्रमुख, व्यवस्थापक, काळजीवाहकाचे आभार मानत त्या सगळ्यांनी आनंदाने मेंगलोर गाठले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -