Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीजळगाव न्यायालयात गोळीबाराचा प्रयत्न करून पळालेल्या आरोपीला कल्याणमध्ये अटक

जळगाव न्यायालयात गोळीबाराचा प्रयत्न करून पळालेल्या आरोपीला कल्याणमध्ये अटक

रेल्वे पोलिसांनी मंगला एक्सप्रेसमधून पिस्तूलसह केली अटक

कल्याण : मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीच्या हत्येचा कट रचत थेट बाप आपल्या साथीदारासह जळगाव न्यायालयात वेशभूषा करून पिस्तूल घेऊन पोहचला. मात्र एका खबऱ्याने दोघा मारेकऱ्यांचा कट उधळून लावत जळगाव पोलिसांना माहिती देताच गोळीबाराच्या प्रयत्नात असलेल्या बापाला पोलिसांनी जागीच पिस्तूलासह अटक केली. मात्र त्याचा साथीदार पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. तो जळगाव रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये प्रवास करीत असतानाच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून विदेशी पिस्तूल व काडतुसांसह अटक केली. सुरेश रवी इंधाते असे पिस्तूलसह अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोहर दामू सुरडकर यांचा मुलगा धम्मप्रिय (१९) हा एका हत्येचा गुन्ह्यात २२ सप्टेंबर २०२१ रोजी जामिनावर सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी जात होता. त्यावेळी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली येताच शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय २१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय २१) या दोघा आरोपींनी धम्मदिपवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात धम्मदिप जागीच ठार झाला होता. तर वडील मनोहर दामू सुरडकर जखमी झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही कारागृहातच आहेत.

दरम्यान, २० फ्रेब्रुवारी रोजी धम्मदीप हत्येच्या प्रकरणी जळगाव न्यायालयात सुनावनी असल्याने आरोपी शेख समीर व रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात येणार होते. याची माहिती धम्मदीपचे वडील मनोहर सुरडकर यांना मिळाली. मुलाच्या खुनाचा राग त्यांच्या डोक्यात कायम असल्याने त्याचा बदला घेण्यासाठीच मुलाची हत्या करणाऱ्या दोघांना संपविण्याचा त्यांनी कट रचला होता त्यानुसार वडील मनोहर सुरडकर आणि साथीदार सुरेश रवी इंधाटे हे कुणालाही संशय येवू नये म्हणून दोघे चक्क बुरखा घालून मुस्लिम महिलांच्या पेहरावात न्यायालय परिसरातल्या मंदिराजवळ बसले होते.

मात्र मुस्लिम पेहरावातील दोघांना पाहून पोलिसांच्या एका खबर्‍याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकाला दिली. त्यावेळी पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा रचून गोळीबार करून हत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. मात्र पोलिसांशी झालेल्या झटापटीत मनोहर सुरळकर याला अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेला सुरेश रवी इंधाटे याने तेथून पळ काढला. मात्र आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे पोलिसांना मंगला एक्सप्रेसमधून हत्यारांसह सुरेश नावाचा आरोपी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण स्थानकात मंगला एक्सप्रेस येताच सुरेश इंधाते याला पिस्तूलसह अटक केली. आज त्याला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -